ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तानच्या संघाने इतिहास रचला आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानच्या संघाने दमदार कमबॅक करत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कांगारुंची शिकार करून दाखवली. २२ वर्षांनी पाकिस्तान संघानं ऑस्ट्रेलिया वनडे मालिका जिंकल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियात छाप सोडणारा दुसरा पाक कॅप्टन ठरला रिझवान
ऑस्ट्रेलियन मैदानात संघाला वनडे मालिका जिंकून देणारा मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा दुसरा कॅप्टन ठरला आहे. ऐतिहासिक मालिका विजयानंतर मोहम्मद रिझवान याने आपल्या कॅप्टन्सीसंदर्भात मोठ वक्तव्य केले आहे. हा मुद्दा सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. ऑस्ट्रेलियात दोन दशकानंतर मालिका जिंकून दिल्यानंतर रिझवान म्हणाला की, मी फक्त टॉस आणि पोस्ट मॅच प्रेजेंटेशनसाठी संघाचा कॅप्टन आहे.
मालिका विजयानंतर नेमकं काय म्हणाला मोहम्मद रिझवान?
मोहम्मद रिझवानन सामन्यानंतर म्हणाला की, "माझ्यासाठी हा खूप खास क्षण आहे. संपूर्ण देश आज आनंदी असेल. मागील काही दिवसांपासून आम्ही अपेक्षेला साजेसा खेळ करू शकलो नव्हतो. मी फक्त टॉस आणि प्रेजेंटेशनसाठी कॅप्टन आहे. संघातील प्रत्येकजणाकडून मला फील्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंगसंदर्भात सल्ला मिळतो." असे म्हणत त्याने संघातील प्रत्येकाचा रोल महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं हे मोठे चॅलेंज असते. पण गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आम्ही त्यांना मात देऊ शकलो, असे म्हणत त्याने गोलंदाजांनाही मालिका विजयाचे श्रेय दिले आहे.
पाकचे 'अच्छे दिन'
सातत्याने अपयशाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान संघानं मागील ५ सामन्यात ४ विजयाची नोंद केली आहे. यात दोन मालिका विजयाचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेनंतर ते आता ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतही छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर राकिस्तानचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.