मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये धमाकेदार सुरुवात केलेल्या राजस्थान रॉयल्सची (Rajastan Royals) गाडी नंतर घसरली आणि त्यानंतर त्यांना गुणतालिकेत अखेरच्या संघांमध्ये समाधान मानावे लागले होते. यामध्ये राजस्थानसाठी दमदार कामगिरी केलेल्या संजू सॅमसनचीही (Sanju Samson) कामगिरी सातत्याने खालावत चालली होती. मात्र रविवारी त्याने आपआ फॉर्म मिळवताना मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) धमाकेदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यानंतर त्याने, ‘मी माझ्यावरील भरवसा कायम ठेवला होता,’ असे सॅमसनने सांगितले.
मुंबईविरुद्धच्या विजयात मोलाची खेळी खेळलेल्या सॅमसनने नाबाद ५४ धावांची खेळी करताना सामनावीर बेन स्टोक्ससह तिसºया गड्यासाठी नाबाद १५२ धावांची भागीदारीही रचली. या शानदार विजयानंतर सॅमसन म्हणाला की, ‘मी स्वत:वरील विश्वास कायम राखला होता. जेव्हा तुम्ही १४ सामने खेळत असता तेव्हा चढ-उतार येतच असतात. प्रत्येक सामन्यातील खेळपट्टी वेगळी असते आणि त्यानुसारच खेळ करावा लागतो. मी देखील मुंबईविरुद्धच्या सामन्यात तशीच कामगिरी केली.’
सॅमसन पुढे म्हणाला की, ‘धावांचा पाठलाग करताना मी आवश्यक धावगतीचा कोणताही विचार केला नाही. केवळ समोर येणाºया चेंडूंच्या गुणवत्तेनुसार फटकेबाजी केली. खेळपट्टीवर जम बसविण्यासाठी मला ५-६ चेंडूंचा अवधी लागला.’