Join us  

टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतचा दावा, म्हणाला...

भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय कधी सापडणार, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांत या क्रमांकासाठी अनेक पर्याय आजमावण्यात आले, पण हाती काहीच लागलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 3:16 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय कधी सापडणार, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. गेल्या तीन वर्षांत या क्रमांकासाठी अनेक पर्याय आजमावण्यात आले, पण हाती काहीच लागलं नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतही चौथ्या क्रमांकाचा योग्य पर्याय नसल्याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला. वर्ल्ड कप स्पर्धेत लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियानं पर्याय शोधला होता, परंतु शिखर धवनच्या दुखापतीमुळे त्याला सलामीला यावं लागले.

पण, आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी रिषभ पंतने या क्रमांकावर दावा सांगितला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. तो म्हणाला,'' मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. हा क्रमांक माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही आयपीएलमध्ये मी याच क्रमांकावर खेळलो आहे. त्यामुळे हे काम माझ्या नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मला वेगळा सराव किंवा फलंदाजीत बदल करण्याची गरज नाही. परिस्थितीनुसारच मी खेळत आलो आहे.''

युवा यष्टिरक्षक पंतने 2017मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018मध्ये त्यानं कसोटीत पदार्पण केले. तो म्हणाला,''क्रिकेटच्या फॉरमॅटबद्दल मी फार विचार करत नाही. कसोटी क्रिकेट खेळल्यानं मला चांगला अनुभव मिळाला आहे. कसोटी क्रिकेट हे सर्वात आव्हानात्मक असल्याचं लोक सांगतात. त्यामुळे मलाही फार शिकायला मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवी शिकवण देणारा असतो. त्यातुलनेत वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सारे वेगाने घडते.''

3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विंडीज दौऱ्यासाठीच्या तीनही फॉरमॅटमधील संघात पंतचा समावेश करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पंत म्हणाला,''धोनीची उणीव भरून काढणे प्रचंड आव्हानात्मक आहे, पण मी याच गोष्टीचा विचार करत राहिलो तर कामगिरीवर परिणाम होईल. त्यामुळे लोकं काय म्हणत आहेत, याचा विचार मी नाही करत. मला काय करायचे आहे, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.''

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंतमहेंद्रसिंग धोनी