Join us  

मुझे फर्क पडता है! विराट कोहलीचा तुम्हाला हा खास संदेश

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं एका व्हिडिओच्या माध्यामातून भारतीयांना एक आव्हान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 7:45 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं एका व्हिडिओच्या माध्यामातून भारतीयांना एक आव्हान केलं आहे. यामध्ये त्यानं प्रदूषणाविरुद्ध सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याचे अवाहन केलं आहे. ट्विटरवर विराट कोहलीनं एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्यानं दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाला आवर घालण्याचे आवाहन केले आहे. प्रदूषणाविरुद्धची मॅच जिंकण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल, असे विराट व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाला.

या व्हिडिओत विराटने दिल्लीकरांना आवाहन केलंय की, त्यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा जेणेकरून प्रदूषणाला आळा घालता येईल. त्याने हा व्हिडिओ मुझे फर्क पडता है हा हॅशटॅग वापरून केला आहे.

कोहली व्हिडिओत म्हणाला की, सर्वांनाच माहिती आहे की, दिल्लीत प्रदूषणाची स्थिती काय आहे. मला तुम्हा सर्वांना सांगायचंय की, आपण सगळे प्रदूषणाबाबत बोलत आहोत, त्यावर वाद घालत आहोत. पण कुणी याच्याशी दोन हात करण्याचा विचार केलाय? आपल्या प्रदूषणाविरूद्धची मॅच जिंकायची असेल तर सर्वांनी एकत्र यावं लागेल. कारण प्रदूषण कमी करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

 

दिल्ली आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून धूरमिश्रित धुक्याची चादर कायम आहे. यामुळे लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबरपासून ५ दिवस वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. यावरुन एनजीटीने दिल्ली सरकारला धारेवर धरले आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, लाहोरमधील प्रदुषणासाठी दिल्ली सरकारला जबाबदार कसे धरता?  सम-विषम काळात दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (डीटीसी) आणि क्लस्टर बसमध्ये प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. डीटीसीकडे ४००० बस आहेत, तर १६०० क्लस्टर बस आहेत. मेट्रोशिवाय दिल्लीतील नागरिक या बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. सम-विषम योजना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत लागू असणार आहे. मात्र यावर हरीत लवादाने शंका उपस्थित केली आहे. 

टॅग्स :क्रिकेटविराट कोहलीप्रदूषण