Virat Kohli Vs Rohit Sharma : निवड समितीनं वन डे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीसोबतच्या वादाच्या चर्चा सुरू झाल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली वन डे मालिकेत खेळण्यास विराट उत्सुक नसल्याच्याही वावड्या उठल्या. विराटनं आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी या सर्व चर्चा सीमापार उडवून लावल्या. पण, आता रोहितनेच माघार घेतल्यानं पुन्हा एकदा अशीच चर्चा सुरू झाली आहे आणि त्यावर निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी स्पष्ट मत मांडले. त्यांनी विराट व रोहित यांच्यातील वादाच्या सर्व चर्चांचे खंडन केले.
चेतन शर्मा म्हणाले,''या दोघांमध्ये सर्वकाही चांगलं आहे. त्यामुळेच मी सांगतोय की अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपण सर्वप्रथम क्रिकेटपटू आहोत आणि निवड समिती सदस्य नंतर. या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. त्यांच्या वादाबाबतच्या बातम्या वाचून मलाच हसू आवरत नाही. या दोघांमध्ये एवढं चांगलं ताळमेळ आहे आणि संघाच्या भविष्याच्या दृष्टीनं ही दोघं एकमेकांशी नेहमी संवाद साधत असतात. तुम्ही माझ्या जागी असता तर ही दोघं एकत्र कसं काम करत आहेत, हे पाहून तुम्हालाही आनंद झाला असता. ही दोघं एक संघ आणि कुटूंबासारखे काम करत आहेत.
''या दोघांमधील वादाच्या चर्चा रंगवल्या जातात, हे पाहून वाईट वाटतं. त्यामुळे २०२१सोबत या वादाच्या चर्चाही मागे सोडा. चांगला संघ बनवण्यावर चर्चा करा,''असेही शर्मा म्हणाले. वन डे संघाचे कर्णधारपद विराटकडून काढून घेण्याबाबत शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले. मर्यादित षटकांच्या संघासाठी एकच कर्णधार असावा, असे निवड समितीचे मत होते. कसोटी संघाची घोषणा करतानाच हा निर्णय जाहीर केला, कारण कसोटी मालिका सुरू असतानाच हा निर्णय जाहीर केला असता तर त्याचा संघावर परिणाम जाणवला असता, असेही शर्मा म्हणाले.