टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं पुण्यातील रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केल्याची चर्चा दिवसभर रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातील रोजंदारी कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अशा रोजंदारी कामगारांसाठी धोनीनं आर्थिक मदत केल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले. रोजंदारी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी मुकूल माधव फाऊंडेशन ही संस्था निधी गोळा करत आहे, त्यांच्या या उपक्रमाला धोनीनं 1 लाखांची मदत केली असल्याचं वृत्त सकाळी धडकलं. पण, यावर धोनीची पत्नी साक्षीचं वेगळंच उत्तर आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि पुण्यातील संख्याही अधिक आहे. त्यामुळे अन्य शहरांप्रमाणे हेही शहर पूर्णपणे लॉकडाऊन केले गेले आहे. धोनीनं केलेल्या मदतीतून रोजंदारी कामगारांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. मुकूल माधव फाऊंडेशननं पुणे शहरातील अशा काही रोजंदारी कामगारांना शोधलं आहे आणि त्यांना ही मदत केली जाणार असल्याचा दावा केला गेला. साबण, कडधान्य, तांदुळ, पीठ, तेल, पोहा, बिस्किट इत्यादी वस्तू या कुटुंबीयांना देण्यात येतील.
धोनीची पत्नी साक्षीनं इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही माहीती शेअर केली, असा दावा केला गेला. तिनं इतरांनाही देणगी देण्याचं आवाहन केल्याचं म्हटलं. या उपक्रमातून 12 लाख 50 हजार निधी जमा करण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. धोनीच्या मदतीनंतर फाऊंडेशनच्या निधीचा आकडा 12 लाखांच्या वर गेल्याचं सांगण्यात आलं. पण, साक्षीनं ट्विट करून चुकीचे वृत्त न पसरवण्याची विनंती केली.
तिनं ट्विट केलं की,''मी सर्व पत्रकारांना विनंती करते की अशा संवेदनशील प्रसंगात चुकीच्या बातम्या पसरवू नका. असे बेजबाबदार पत्रकारीता कुठून येते, याचे मला आश्चर्य वाटते.''
धोनीच्या एक लाखाच्या मदतीवर नेटिझन्सकडून टीकाही झाली. काहींनी तर 800 कोटींचा मालक केवळ एक लाख देतो, यावरून धोनीला धारेवर धरले. आता साक्षीनं केलेलं ट्विट हे नेटिझन्सने पसरवलेल्या बातम्यांसाठी आहे की 1 लाखाच्या मदतीसाठी हे स्पष्ट होत नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी; अझरुद्दीननं सांगितली पडद्यामागची गोष्ट
UEFA Champions Leagueच्या फुटबॉल सामन्यामुळे इटलीत पसरला महाभयंकर Corona Virus?
Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत
'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार
Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?