नवी दिल्ली : ‘स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी असलेला मी काही पहिला खेळाडू नाही. माझ्याआधी आणि नंतरही अनेक खेळाडूंनी फिक्सिंगचा गुन्हा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अन्य दोषींसोबत चांगला व्यवहार केला. यादृष्टीने मलादेखील एक संधी मिळायलाच हवी,’असा आग्रह पाकिस्तानचा दोषी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याने केला आहे. आसिफला पाकिस्तानच्या २०१० च्या इंग्लंड दौऱ्यात स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून सात वर्षे बंदीची शिक्षा देण्यात आली. तो काही काळ ब्रिटनच्या कोठडीतही होता.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना मोहम्मद आसिफ म्हणाला, ‘प्रत्येक जण चूक करतो. ही चूक मीदेखील केली. माझ्याआधी आणि नंतरही अनेक जणांनी स्पॉट फिक्सिंचा गुन्हा केला आहे; मात्र त्यातील काही चेहरे पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करीत आहेत. माझ्यानंतर असे काम करणारे खेळाडू आज संघात खेळत आहेत. प्रत्येकाला आणखी एक संधी मिळाली, पण माझ्यासारख्या काही खेळाडूंना दुसरी संधी नाकारण्यात आली. जगभरात सन्मान मिळालेला मी वेगवान गोलंदाज असताना पीसीबीने मला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.’
मागील काही वर्षांत पाकिस्तानच्या खेळाडूंची मॅच फिक्सिंगमध्ये वारंवार नावे उघड झाली आहेत. अनेक गौप्यस्फोट झाले. अलीकडे फलंदाज उमर अकमल याच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगचा गुन्हेगारी कक्षेत समावेश करण्याची सरकारकडे विनंती केली आहे.
पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांनी नुकतीच हतबलता व्यक्त करीत आमच्याकडे भ्रष्टाचार प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याचे, साक्ष नोंदविण्याचे आणि बँक खाते तपासण्याचे वैधानिक अधिकार नसल्याची खंत बोलून दाखवली होती.
‘मी आधीही सरकारला यासंदर्भात विनंती केली आहे. आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका यांसारख्या क्रिकेट खेळणाºया देशात मॅच फिक्सिंगला गुन्हेगारी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे . पाकिस्तान सरकारदेखील आमच्या समस्येकडे लक्ष देईल,’ अशी अपेक्षा मनी यांनी व्यक्त केली होती.
Web Title: I should get another chance - Mohammad Asif
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.