बंगळुरू : अमेरिका-वेस्ट इंडीजच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी विराट कोहलीच्या भारतीय संघातील समावेशाबाबतच्या चर्चेला ऊत आला असताना खुद्द विराटनेच सडेतोड उत्तर दिले आहे.
‘माझ्याकडे टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये कायम असून असून, जगभरात या प्रकाराचा प्रसार करण्यापुरता मर्यादित असलेला खेळाडू मी नाही,’ या शब्दांत विराटने टीकाकारांना सुनावले. कोहली मुलाच्या जन्मामुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी आयपीएल सामन्यात ४९ चेंडूंत ७७ धावा ठोकून त्याने आरसीबीला पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून दिला.
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर ३५ वर्षांचा विराट पुढे म्हणाला, ‘आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात मला स्थान मिळेल का, याविषयी शंका असल्याचे वृत्त काही दिवसांआधीच मी वाचले. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी झाली तरच माझ्या नावाचा विचार होऊ शकेल, असेही वृत्तात म्हटले होते.
यश, आकडेवारी, विक्रम या विषयी न बोलता टीकाकार नेहमी भविष्याची चर्चा करतात. माझ्या मते, खेळाडूसाठी मैत्री, प्रेम, कौतुक, पाठिंबा हेच महत्त्वाचे आहे. कारकिर्दीनंतरही या गोष्टी विस्मरणात जात नाहीत.’
नवे फटके उपयुक्त ठरतातवेगवान गोलंदाजांविरुद्ध ऑफ साइडला हवेत फटका मारण्याविषयी कोहली म्हणाला, ‘मी कव्हर ड्राइव्ह चांगला मारतो हे अनेकांना ठाऊक असल्याने ते मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी नवे फटके उपयुक्त ठरतात.’
लोक आम्हाला ओळखतही नव्हते!विराट व पत्नी अनुष्का हे मुलाच्या जन्मामुळे दोन महिने देशाबाहेर होते. याविषयी तो म्हणाला, ‘आम्ही अशा ठिकाणी होतो, जिथे लोक आम्हाला ओळखू शकत नव्हते. मी दोन महिने सामान्य व्यक्तीप्रमाणे कुटुंबासोबत राहिलो. आमच्या कुटुंबासाठी हा शानदार अनुभव होता. याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. सामान्यांप्रमाणे रस्त्यावर फिरणे, कुणी तुम्हाला ओळखत नाही याची खात्री वाटणे, सामान्यांसारखे जगणे हा अद्भुत असाच अनुभव होता.’