शारजा : किंग्ज इलेव्हन पंजाबला रोखण्यासाठी राजस्थानने धसका घेतला तो लोकेश राहुलचा. मात्र त्याचवेळी त्यांना विसर पडला तो मयांक अग्रवालचा आणि झालेही तसेच. मयांकने सुरुवातीपासून केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने धावांचा डोंगर उभारताना राजस्थानविरुद्ध २० षटकांत २ बाद २२३ धावा केल्या.
शारजाहच्या लहान मैदानावर चौकार-षटकारांची शक्यता वर्तविण्यात आली होती. मयांक-राहुलने अपेक्षित खेळ करताना राजस्थानला मोठी धावसंख्या उभारुन दिली. आरसीबीविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात तडाखेबंद शतक केलेल्या राहुलकडून पुन्हा एकदा अशाच खेळीची अपेक्षा होती. परंतु, राजस्थानविरुद्ध तळपला तो मयांक. त्याने ५० चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत १०६ धावा फटकावल्या. राहुलनेही ५४ चेंडूंत ६९ धावा करत राजस्थानला घाम फोडला. दोघांनी ९९ चेंडूंत १८३ धावांची जबरदस्त सलामी दिली.
मयांकचा धडाकाच असा होता की, त्याला चेंडू नेमका कुठे आणि कसा टाकावा हेच राजस्थानच्या गोलंदाजांना कळत नव्हते. त्यातच लय बिघडलेल्या राजस्थानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला तो दुसऱ्या टोकावर उभा असलेल्या राहुलने. त्यामुळे राजस्थान डबल धुलाई झाली. दोघेही बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने दोनशेचा पल्ला पार केला.