नवी दिल्ली : ‘मैदानावर आणि मैदानाबाहेर महेद्रसिंग धोनी माझ्यासाठी मार्गदर्शकासारखा आहे. मला कोणतीही समस्या आली तरी मी त्याच्याशी बोलतो, पण तो कधीही मला पूर्णपणे मदत करत नाही,’ असे वक्तव्य युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर केले आहे.
धोनी आपल्याला प्रेरणा देत असल्याचे सांगून ऋषभ पुढे म्हणाला, ‘मी त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये यासाठी तो असे करीत असावा. समस्यांवर मात करण्यासाठी माही मला युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. फलंदाजीदरम्यान तो माझा सर्वात आवडता साथीदार आहे. ज्यावेळी तो मैदानात असतो त्यावेळी तुम्ही निश्चिंत असता. त्याच्या डोक्यात कल्पना तयार असते आणि तुम्हाला फक्त त्याप्रमाणे वागायचे असते.’
२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरला होता. या स्पर्र्धेनंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली. मात्र मिळालेल्या संधीचा लाभ ऋषभ पंतला घेता आला नव्हता. यष्टींमागची ढिसाळ कामगिरी आणि बेजबाबदार फलंदाजी यामुळे सोशल मीडियावर पंतला सतत चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र पंतसाठी धोनी हा आपल्या एका मार्गदर्शकासारखा आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या चॅटवर बोलत असताना पंतने धोनीबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या. पंत हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो.
ऋषभ पंतची खराब कामगिरी पाहता काही महिन्यांपूर्वी घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने रिद्धिमान साहा याला पसंती दिली होती. सोबत नववर्षातील न्यूझीलंड दौऱ्यात लोकेश राहुलने टी-२० आणि वन-डे मालिकेत यष्टिरक्षण केले होते. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पंतने भारतीय संघात पुनरागमन केले खरे, मात्र त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती.