sachin tendulkar । नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की खेळाडूंमध्ये देखील एक वेगळी ऊर्जा असते. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही देशाचे सामने केवळ आशिया चषक आणि आयसीसीच्या स्पर्धांमध्ये होत आहेत. मात्र, नव्वदच्या दशकात दोन्ही संघांमध्ये नेहमी द्विपक्षीय मालिका पाहायला मिळायची. याच मालिकेतील एक किस्सा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सकलेन मुश्ताकने सांगितला आहे. सचिनच्या एका कृतीमुळे त्याच्याप्रती माझा आदर वाढला असल्याचे मुश्ताकने म्हटले.
सकलेन मुश्ताकने केला खुलासा पाकिस्तानातील एका पॉडकास्टशी बोलताना सकलैन मुश्ताकने एक मजेशीर किस्सा सांगितला. सचिन महान खेळाडू का आहे असे सांगताना त्याने म्हटले, "सचिनसोबत एकदा माझा वाद झाला होता. आम्हा कॅनडात होतो आणि मी इंग्लंडमधून काउंटी क्रिकेट खेळून तिथे पोहचलो होतो. मी तेव्हा युवा होतो आणि गोलंदाजीच्या आपल्या दुनियेत होतो. त्यामुळे काउंटी खेळल्यानंतर मी थोडा अहंकारी झालो होतो. सचिन खूपच बुद्धिमान क्रिकेटर होता. मी त्याला पहिले षटक टाकले आणि स्लेजिंग करण्यास सुरूवात केली. मी कठोर शब्दांत शिवी देण्याचा प्रयत्न केला. तितक्यात सचिन माझ्याजवळ आला आणि प्रेमाने बोलला की, 'साकी, तू असे करशील याचा कधी मी विचार देखील केला नव्हता. अन् तू असा बोलणारा व्यक्ती देखील वाटत नाहीस. मला वाटले की तू खूप चांगला खेळाडू आहेस."
सचिन तेंडुलकरने सांगितलेल्या या शब्दांवर सकलेन मुश्ताकने विचार केला आणि पुढची गोष्ट सांगितली. या संदर्भात, तो म्हणाला की, सचिनने मला या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे सांगितल्या. याशिवाय त्याच्या बोलण्याने पुढील 4 षटकांसाठी मला प्रभावित केले. त्याने मला जे काही सांगितले ते ऐकून मी इतका व्यथित झालो की मला काही समजण्याआधीच त्याने आपले काम केले. फलंदाजी करताना तो सेट झाला आणि माझ्या तोंडावर थप्पड मारल्यासारखे वाटले. कारण त्याने माझ्यासोबत मानसिक खेळ खेळला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"