NZ vs IND 2nd T20I: "मला संघातील प्रत्येकाला एक संधी द्यायची आहे", विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 06:38 PM2022-11-20T18:38:36+5:302022-11-20T18:41:30+5:30

whatsapp join usJoin us
I want to give everyone in the team a chance, said Indian captain Hardik Pandya after the win against New Zealand  | NZ vs IND 2nd T20I: "मला संघातील प्रत्येकाला एक संधी द्यायची आहे", विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

NZ vs IND 2nd T20I: "मला संघातील प्रत्येकाला एक संधी द्यायची आहे", विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने रविवारी यजमान न्यूझीलंडच्या संघाला पराभवाची धूळ चारली. खरं तर मालिकेतील पहिला सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करावा लागला होता. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने यजमान संघाचा ६५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता किवी संघाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पुढचा सामना जिंकणे गरजेचे असणार आहे. आपल्या संघाच्या या विजयाने कर्णधार हार्दिक खूप खूश झाला आणि त्याने संघाचे खूप कौतुक केले.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार हार्दिक पांड्याने म्हटले, "यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. सर्वांनी चांगले केले पण सूर्याकडून निश्चितच एक खास खेळी पाहायला मिळाली. आम्ही १७०-१७५ धावा करण्याबद्दल बोलत होतो. गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी केली. मैदान खूप ओले होते, त्यामुळे याचे श्रेय गोलंदाजांना जाते." अशा शब्दांत पांड्याने संघाचे कौतुक केले. 

संघातील प्रत्येकाला एक संधी द्यायची आहे - पांड्या 
"मी खूप गोलंदाजी केली आहे, त्यामुळे पुढे जाऊन मला गोलंदाजीचे आणखी पर्याय पाहायचे आहेत. नेहमी चालेल असे नाही पण फलंदाजांनीही गोलंदाजी करावी असे मला वाटते. मी त्यांच्याकडून साजेशी खेळी करण्याची अपेक्षा करतो जी ते करत आहेत. हे असे वातावरण तयार करण्याबद्दल आहे जिथे ते सर्व आनंदी ठिकाणी आहेत. मी या संघात अनेक वेळा पाहतो की सर्व खेळाडू एकमेकांच्या यशाबद्दल आनंदी आहेत आणि ते महत्त्वाचे देखील आहे. मला माहिती नाही (पुढील सामन्यातील बदलांबद्दल) पण मला संघातील प्रत्येकाला संधी द्यायची आहे पण अजून एकच सामना उरला आहे त्यामुळे हे कठीण जाणार आहे." 

भारताची मालिकेत आघाडी 
यजमान न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून ईशान किशन आणि रिषभ पंत यांनी डावाची सुरूवात केली. मात्र रिषभ पंत केवळ ६ धावा करून तंबूत परतला. मात्र किशनने सावध ३६ धावांची खेळी करून साजेशी सुरूवात करून दिली. परंतु त्यालाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि किशनला ईश सोधीने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली. सूर्याने ५१ चेंडूत १११ धावांची शतकी खेळी करून इतिहास रचला. त्याच्या या खेळीत तब्बल ७ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. खरं तर सूर्याच्या या शतकी खेळीमुळे भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सूर्यकुमारने सुरूवातीपासूनच ताबडतोब खेळी करून किवी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारताने २० षटकांत ६ बाद १९१ धावा केल्या होत्या. 

 भारताने दिलेल्या १९२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाला घाम फुटला. कर्णधार केन विलियमसनने ५२ चेंडूत ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्याच्याशिवाय कोणत्याच किवी फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. अखेर न्यूझीलंडचा संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ६५ धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय फिरकीपटूंनी सांघिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. दिपक हुड्डाने सर्वाधिक ४ बळी पटकावले, तर मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी २-२ बळी घेता आले. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: I want to give everyone in the team a chance, said Indian captain Hardik Pandya after the win against New Zealand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.