नवी दिल्ली : आजपासून टी-२० विश्वचषक २०२२ चे (T20 World Cup 2022) बिगुल वाजले आहे. सुपर-१२ची फेरी गाठण्यासाठी आज श्रीलंका आणि नामिबिया (SL vs NAM) यांच्यात लढत पार पडली. आशियाई चॅम्पियन्सला धूळ चारून नवख्या नामिबियाच्या संघाने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध (IND vs PAK) होणार आहे. यापूर्वी रोहितसेना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध सराव सामने खेळेल. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली नेटमध्ये चांगलाच घाम गाळत आहे. विराट सध्या शानदार फॉर्ममध्ये असून विश्वचषकातील त्याच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
दरम्यान, विराट कोहली जगातील सर्वाधिक प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेट विश्वात विराटचे लाखो चाहते आहेत. सध्या विराटच्या अशाच एका चाहत्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्याने अनेक दिग्गजांचे लक्ष वेधले आहे. सध्या लडाखमधील एका तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. लडाखमधील या व्हिडीओमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका चिमुकलीने आपल्या फलंदाजीने आणि विराट कोहलीप्रमाणे खेळण्याची आकांक्षा बाळगून सर्वांनाच थक्क केले आहे. हा व्हिडीओ पाहून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील प्रभावित झाली आहे.
लडाखच्या चिमुकलीने वेधले लक्ष खरं तर हा व्हिडीओ लडाखच्या शालेय शिक्षण विभागाने (DSE) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे आणि या ट्विटमध्ये लिहिले आहे, "घरी माझे वडील आणि शाळेतील माझे शिक्षक मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. मी विराट कोहली सारखे खेळण्यासाठी प्रयत्न करेन. (मकसुमाच्या सहाव्या वर्गातील विद्यार्थिनी)."
या व्हिडीओतून संबंधित मुलगी बोलताना म्हणते की, मी लहानपणापासून क्रिकेट खेळतेय. मी अजूनही हेलिकॉप्टर शॉट खेळायला शिकत आहे. आम्ही दोन धावाही काढतो पण थकून जातो आणि दुसऱ्या धावेसाठी धावावेसे वाटत नाही. माझा आवडता क्रिकेटर विराट कोहली आहे आणि मला त्याच्यासारखे खेळायचे आहे." सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.
भारतीय महिलांनी सातव्यांदा जिंकला आशिया चषकमहिला आशिया चषकामध्ये पुन्हा एकदा भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. शनिवारी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने होते. या सामन्यात भारतीय संघाने ८ बळी राखून मोठा विजय मिळवला आणि सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताकडून शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ अवध्या ६५ धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात मराठमोळ्या स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"