Virat Kohli Fan in Pakistan : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohil) याचे जगभरात चाहते आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराटच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येतूनच त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज बांधता येईल. विराटची आक्रमकता, आरे ला कारे करण्याची वृत्ती अन् डोळ्याचे पारणे फेडणारी फलंदाजी यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या वाढतच चाललीय. दोन वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय शतक हुलकावणी देत असले तरी चाहत्यांचे प्रेम काही आटलेले नाही. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ( Pakistan ) येथेही विराटचे चाहते आहेत, हे काही वेगळे सांगायला नको. पण, समोर पाकिस्तानचा स्टार मोहम्मद रिझवान फटकेबाजी करत असताना स्टेडियमवर विराटचे फलक झळकणे, म्हणजे पाक फलंदाजाचा पोपट करण्यासारखेच आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) शुक्रवारी मुलतान सुलतान ( Multan Sultans) विरुद्ध क्युएता ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators) यांच्यातल्या सामन्यात लाहोरच्या स्टेडियमवर विराट कोहलीचे पोस्टर झळकले. प्रथम फलंदाजी करताना मुलतान संघाकडून शान मसूद, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि रिली रोसोव यांनी तुफान फटकेबाजी केली. शान मसूदने ३८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५७ धावा केल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ११९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रिझवान व रोसोव यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोसोव २६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावा करून बाद झाला. रिझवानने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावांची खेळी करून मुलतान संघाला २० षटकांत ३ बाद २४५ धावा उभ्या करून दिल्या.
या सामन्यात स्टेडियमवर झळकला विराट कोहली..
विराट कोहलीची कारकीर्दविराटने ९९ कसोटी सामन्यांत ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. २६० वन डे सामन्यांत त्यानं ५८.०७च्या सरासरीने १२३११ धावा करताना ४३ शतकं व ६४ अर्धशतकं झळकावली आहेत. ट्वेंटी-२०तही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ९६ सामन्यांत ५१.४९च्या सरासरीने ३२४४ धावा केल्या आहेत.