शिर्डी : आपल्या डान्समध्ये करियर करायचे होते, पण वडिलांचा विरोध होता म्हणून क्रिकेटर झाले, अशा शब्दांत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यातील महिला खेळाडूंच्या संख्येअभावी आयपीलएल क्रिकेट सामान्यांसाठी अजून पोषक वातावरण नाही. मात्र राज्य सरकारने महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास येत्या एक दोन वर्षात आयपीएल सामने खेळले जाऊ शकतात, असे मतही मिताली राजने व्यक्त केले.मिताली राज यांनी आई लिला राज व वडील दुरैयी राज यांच्यासह शिर्डी येथे साई दर्शनानंतर साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कुलला आज सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक ताराचंद कोते, सचिन चौगुले, वाल्मीक बावचे आदींची उपस्थिती होती. पुरूषांच्या क्रिकेट सामन्यांप्रमाणे महिलांच्या क्रिकेट सामन्यांना प्रसिद्धी मिळाली तर महिला क्रिकेटलाही चांगले दिवस येतील असे सांगतानाच जिल्हा क्रिकेट समितीने आणि राज्य क्रिकेट समितीने यासाठी पुढाकार घेवून महिलांना प्रोत्साहीत करायला हवे, अशी अपेक्षाही मिताली राज हिने व्यक्त केली.भारतीय महिला क्रिकेट संघाने अलिकडच्या काळात वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामुळे बीसीसीआयकडून चांगले सहकार्य मिळत आहे. महिला खेळाडूंच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. आगामी आफ्रिकेबरोबर होणा-या सामन्यातही भारतीय महिला संघ चमकदार कामगिरी बजावेल, असा विश्वास महिला मिताली राज यांनी व्यक्त केला आहे.वर्ल्ड कप सामन्यांपूर्वी सार्इंचे दर्शन घेवून प्रार्थना केली होती, या स्पर्धेत चांगली कामगिरी झाल्याने आता बाबांना धन्यवाद द्यायला आल्याचेही मितालीने सांगितले.