Join us  

‘अपयशी ठरताच ऑटो चालविण्याचा सल्ला मिळाला होता’; महेंद्रसिंह धोनीने वाढविला उत्साह

 २०१९ च्या आयपीएलमध्ये सिराजने आरसीबीकडून नऊ सामन्यात केवळ सात गडी बाद केले होते. आरसीबीने सुरुवातीच्या सहापैकी एकाही सामन्यात विजय मिळविला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 10:38 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘२०१९ च्या आयपीएल सत्रात खराब कामगिरीनंतर मला क्रिकेट सोडून वडिलांसोबत ऑटो चालविण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र राष्ट्रीय संघाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मोलाचे मार्गदर्शन करीत माझ्या कारकिर्दीवर ‘ब्रेक’ लागण्यापासून वाचविले.’ भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने मंगळवारी हा खुलासा केला. २०१९ च्या आयपीएलमध्ये सिराजने आरसीबीकडून नऊ सामन्यात केवळ सात गडी बाद केले होते. आरसीबीने सुरुवातीच्या सहापैकी एकाही सामन्यात विजय मिळविला नव्हता. त्यावेळी संघ तळाच्या स्थानावर राहिला होता. सिराज म्हणाला, ‘ज्या लोकांनी मला वारंवार ट्रोल केले तेच आज म्हणतात, ‘तू फार चांगला गोलंदाज आहेस भाई!’ मला मात्र आता कुठल्याही प्रतिक्रिया आल्या तरी वाईट वाटत नाही, शिवाय मी हुरळूनही जात नाही. मी त्यावेळचा  सिराज आजही तसाच आहे.’२७ वर्षांच्या सिराजने तेव्हापासून मोठा टप्पा गाठला. आरसीबीने रिटेन केलेल्या तीन खेळाडूंमध्ये सिराजचाही समावेश आहे. आयपीएल २०२० तील दमदार कामगिरीच्या बळावर सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान मिळाले. पदार्पणानंतर ऐतिहासिक गाबा कसोटीत पाच गडी बाद करीत संघात स्थान निश्चित केले.  हा दौरा सुरू होताच सिराजच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, कोरोना बायोबबलमुळे मायदेशी परतण्याऐवजी सिराजने संघासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. ‘माझ्या वडिलांची प्रकृती २०२० पासूनच खालावत होती. मी त्यांच्याशी फोनवर संवाद साधायचो तेव्हा ते अत्यंत भावुक होऊन रडायचे. मी त्यांना रडतानाचा पाहून स्वत:ला अपराधी समजत असल्याने अधिक बोलत नव्हतो. आयपीएल संपले त्यावेळी घरच्यांनी मला वडील इतके गंभीर आहेत, हे देखील सांगितले नव्हते. मी फोन करायचो त्यावेळी घरचे सांगायचे, ‘ ते आराम करीत आहेत. अशावेळी मी गप्प बसायचो. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर कळले की वडिलांची प्रकृती फार गंभीर आहे. मी संपूर्ण कुटुंबासोबत भांडलो. मला आधी अंदाज आला असता तर दौऱ्यावर जाण्याआधी त्यांची भेट घेतली असती. दुसरीकडे कुटुंबाची तळमळ अशी होती की, सिराजची वाटचाल थांबू नये. सर्वांनी मला देशासाठी खेळ, वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा सल्ला दिला.’

केकेआर विरुद्ध सिराजने २.२ षटकात पाच षटकारासह ३६ धावा मोजल्या होत्या. दोनवेळा बिमर(टप्पा न खाता कंबरेच्या वरून जाणारा चेंडू)टाकताच कर्णधार विराट कोहली याने त्याला गोलंदाजी दिली नव्हती. आरसीबी पोडकास्टशी बोलताना सिराज म्हणाला, ‘मी केकेआर विरुद्ध दोन बिमर टाकले तेव्हा चाहते म्हणाले, ‘क्रिकेट सोडून दे, परत जा आणि वडिलांसोबत ऑटो चालव!’ अशा प्रकारच्या खूप कमेंट पाहून मी भांबावलो. टीका करणारे मागचा संघर्ष बघत नाहीत.  मला आठवते, जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रीय संघात निवड झाली त्यावेळी  धोनीने माझा उत्साह वाढवीत सांगितले की, लोक आपल्याबद्दल काहीही बोलत असतील तर त्याकडे डोळेझाक करायला हवी. तू चांगली कामगिरी करशील तेव्हा तुझी प्रशंसाही होईल. खराब कामगिरी झाली तर त्यासाठी वाईट शब्दांचादेखील वापर केला जाईल. अशा सर्व प्रतिक्रिया फार गंभीरपणे घेऊ नकोस.’

‘चांगल्या कामगिरीनंतर माझा फोटो वृत्तपत्रात आला की, वडील ते कात्रण जमा करायचे. त्यांनी बराच संग्रह केला होता. मी कसोटी पदार्पणात रांगेत उभे राहून राष्ट्रगीत गात होतो. त्यावेळी मनात विचार आला की, वडिलांनी मला भारतीय संघाच्या जर्सीत पाहिले असते तर त्यांना किती गर्व वाटला असता. त्यांचे शब्द माझ्या कानात सतत गुंजत असतात.’- मोहम्मद सिराज 

टॅग्स :मोहम्मद सिराजमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ
Open in App