संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे संयुक्तपणे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ( Virat Kohli) ही अखेरची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा विराटनं आधीच केली आहे. कॅप्टन कोहलीच्या या निर्णयावर बीसीसीआय अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्याकडून मोठं विधान आलं आहे. कोहलीच्या या निर्णयामागील काही कारणांवर गांगुलीनं त्याचं मत मांडलं.
'आज तक'च्या सलाम क्रिकेट या कार्यक्रमात तो बोलत होता. त्यात त्याला विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर विचारण्यात आले. त्यावर गांगुली म्हणाला,''या निर्णयाचा आम्हा सर्वांनाच धक्का बसला. इंग्लंड दौऱ्यानंतर कदाचित त्यानं हे ठरवलं असावे. तो पूर्णपणे त्याचा निर्णय आहे आणि आम्ही त्याच्याशी काहीच बोललो नाही किंवा त्यावर दबाव टाकला नाही. आम्ही असे कधीच करत नाही. क्रिकेट मालिकांची संख्याही वाढली आहे आणि ही गोष्ट समजली पाहिजे. मी स्वतः सहा वर्ष कर्णधार होतो. बाहेरून बघताना सर्व चांगलं दिसतं. हा सन्मान आहे, परंतु जसजसा वेळ जातो, तसं खेळाडूवर दबावही वाढतो. हे सर्व कर्णधारासोबत घडतं. कर्णधारपद हे खूप कठीण काम आहे.''
मागील दोन वर्षांत विराटचा फॉर्म साजेसा झालेला नाही, त्यावर गांगुली म्हणाला,''प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत असा प्रसंग येतो. तो माणूस आहे, मशीन नाही. फलंदाजीत त्याचेही आऊटसाईड एज लागतात, फुटवर्क काम करत नाही, चुकीचे फटके मारले जातात. त्याच्या फॉर्मची मला चिंता नाही, तो खूप पुढे गेला आहे. त्याचा आलेख आता उतारावर आहे, परंतु तो लवकरच पुन्हा चढा होईल. प्रदीर्घ काळ खेळल्यावर असं होणं साहजिक आहे.''