कानपूर : ‘पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना मी खूप चिंताग्रस्त होतो. पण काही चेंडूंनंतर आत्मविश्वास मिळाला आणि मी स्थिरावलो,’ अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा नवोदित फिरकीपटू रचिन रवींद्र याने न्यूझीलंडचाच फिरकीपटू एझाज पटेलने न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडलसाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये दिली.
२२ वर्षीय रवींद्र आणि भारतीय वंशाचा एझाज पटेल यांनी सोमवारी मिळून ९१ चेंडू खेळून काढताना १८ धावांची संयमी भागीदारी केली. या दोघांच्या जोरावर न्यूझीलंडने २८४ धावांचा पाठलाग करताना अखेरचा बळी गमावू दिला नाही आणि भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखला. मुंबईत जन्मलेला पटेल पहिल्यांदाच भारतात खेळला. त्याने पहिल्या कसोटीत तीन बळीही मिळवले, तर रवींद्रच्या बळींची पाटी मात्र कोरीच राहिली.सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावरुन रवींद्रच्या वडिलांनी त्याचे नाव ‘रचिन’ असे ठेवले.
भारतीय प्रेक्षकांसमोर खेळणे शानदार अनुभव ठरल्याचे सांगत रवींद्र म्हणाला की, ‘भारतातील प्रसिद्ध क्रिकेटप्रेमींसमोर खेळणे चांगला अनुभव ठरला. माझ्या कारकिर्दीवर माझ्या आई-वडिलांचा मोठा प्रभाव राहिला आहे. माझ्या कामगिरीचा त्यांना नक्कीच अभिमान वाटत असेल.’सामना अनिर्णीत राखण्यात आलेल्या यशाबाबत रवींद्रने पटेलला सांगितले की, ‘भावा, आपण दोघांनी मिळून हे करुन दाखवले. मला माझ्या प्रक्रियेवर आणि सरावावर विश्वास होता. प्रेक्षक खूप आवाज करत होते पण, तरी तू देखील खूप संयम दाखवलास. आपण दोघांनी मिळून एकाग्रता गमावली नाही आणि हा क्षण आपण कधीच विसरु शकत नाही.’