मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने स्टीव्ह स्मिथला पुन्हा कर्णधार होण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. ‘स्टीव्ह स्मिथ पुन्हा कर्णधार बनणार असेल तर मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन,’ असे पेनने म्हटले आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू कुरतडल्याच्या घटनेनंतर स्मिथला कर्णधारपदावरून हटवून पेनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर २-१ असे नमवले. यानंतर पेनच्या नेतृत्त्वावर प्रश्न निर्माण झाले. अनेकांनी त्याला हटवून स्मिथला पुन्हा कर्णधार केले जावे, अशीही मागणी होऊ लागली. फॉक्स क्रिकेटच्या वृत्तानुसार, स्मिथला पुन्हा कर्णधार करावे का? असा प्रश्न विचारल्यावर पेन म्हणाला, ‘मला वाटते की त्याला आणखी एक संधी मिळाली पाहिजे. निश्चितच हा निर्णय माझ्या हातात नाही, परंतु स्मिथ जबरदस्त कर्णधार होता. तो अतिशय हुशार रणनीतिकार आहे.’पेनच्या म्हणण्यानुसार, केपटाऊन घटनेच्या वेळी स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून परिपक्व होता. तो म्हणाला, ‘जेव्हा मी टास्मानियासाठी माझ्या नेतृत्वाची कारकीर्द सुरू केली, तेव्हा तो माझ्यासारखाच होता. लहान वयातच त्याला मोठी जबाबदारी देण्यात आली. मी संघात रुजू झालो, तेव्हा तो परिपक्व कर्णधार झाला होता. त्यानंतर आफ्रिकेविरुद्ध ती घटना घडली. त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आले. पण पुन्हा कर्णधार होणार असेल तर मी नक्कीच त्याला साथ देईन.’
ॲशेस जिंकल्यास नेतृत्व सोडेन!टिम पेनने यंदा ॲशेस मालिकेत इंग्लंडला हरविल्यानंतर मी नेतृत्व सोडेन, असे संकेत दिले. ‘तोपर्यंत किमान सहा कसोटी सामन्यात मी नेतृत्व करणार आहे. ॲशेसमध्ये इंग्लंडचा सफाया करण्यात आम्ही यशस्वी झालो, तर कर्णधारपद सोडण्याची ती योग्य वेळ असेल,’ असे पेनने सांगितले.
भारताने लक्ष विचलित केलेभारताविरुद्ध मालिकेत पराभूत होण्यामागील काय काय, असे विचारताच पेन म्हणाला, ‘भारताने आमचे लक्ष विचलित केले. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो. भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळणार नाही, असे म्हणताच ते कुठे खेळण्यास उत्सुक आहेत, याचा आम्हाला वेध घेता आला नाही. खेळावरील आमचा फोकस दुसरीकडे गेला. त्या दौऱ्यात भारतीय संघ गाबा मैदानावर खेळणार नाही, अशी चर्चा होती. भारत या मैदानावर खेळला आणि अखेरच्या दिवशी ऐतिहासिक विजय नोंदविण्यात यशस्वीदेखील झाला.’