नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. अख्तरच्याच नावावर क्रिकेटच्या इतिहास सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. त्याने 2003 मध्ये क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान (161.3 प्रति तास) चेंडू टाकला होता. अख्तरचा हा विश्वविक्रम आजतागायत कोणताच गोलंदाज मोडू शकला नाही. पण भारताचा उमरान मलिक हा विक्रम मोडेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. कारण उमरान मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 155 प्रति तास वेगाने गोलंदाजी केली आहे. अशातच आता अख्तरने उमरान मलिकबद्दल एक मोठे विधान केले आहे.
दरम्यान, कतारमधील दोहा येथे होत असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत शोएब अख्तर आशिया लायन्स संघाचा भाग आहे. यादरम्यान बोलताना अख्तरने म्हटले, "उमरान मलिक चांगला गोलंदाज आहे. त्याला ताकद मिळाली आहे आणि त्याची रनअप देखील शानदार आहे. तसेच तो धोकादायक वेगवान गोलंदाज आहे. उमरानला हिंमतीने गोलंदाजी करण्याची कला शिकण्याची गरज आहे. गोलंदाजी करताना त्याला कितीही मार पडला तरी त्याने आपली आक्रमकता कधीही सोडू नये. नेहमी वेगवान गोलंदाजी करायला हवी. त्याला दुखापतीपासून वाचायला हवे आणि चांगले प्रशिक्षण घ्यायला हवे."
शोएब अख्तरचं मोठं विधान
उमरान मलिकने प्रति तास 157 च्या सर्वात वेगाने गोलंदाजी केली आहे, त्यामुळे अख्तरला देखील तो आपला विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे. "जर त्याला माझा विक्रम मोडायचा असेल तर मी त्याला मदत करण्यास तयार आहे. 20 वर्षे झाली अद्याप माझा विक्रम कोणीही मोडला नाही, म्हणून तो मोडून टाक आणि तेव्हा तुला मिठी मारणारा मी पहिला व्यक्ती असेन. मी तुम्हाला सांगतो की, मी माझी रनअप 26 यार्ड्सवरून घ्यायचो आणि उमरान 20 यार्ड्सवरून त्याची रन अप घेतो. त्यामुळे त्याला त्याचे स्नायू तयार करावे लागतील आणि तो ते नक्कीच करेल", अशा शब्दांत अख्तरने उमरान मलिकच्या गोलंदाजीचे कौतुक केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: I will help Umran Malik if he wants to break my record, says former Pakistan player Shoaib Akhtar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.