पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी कठोर पावलं उचलली जात आहेत. त्याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला एका दहशतवादी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आयएसआयएस काश्मीर नावाच्या दहशतवादी संघटनेने गौतम गंभीरला ही धमकी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आयएसआयएस काश्मीर या दहशतवादी संघटनेने ईमेलच्या माध्यमातून गौतम गंभीरला ही धमकी दिली आहे. धमकी देणारा ई मेल प्राप्त झाल्यानंतर गौतम गंभीर याने त्वरित पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली आहे. तसेच या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे.
गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी देणारा हा ईमेल २२ एप्रिल रोजी मिळाला होता. या ईमेलमध्ये I KILL YOU असं या ईमेलमध्ये लिहिलेलं होतं. तत्पूर्वी गौतम गंभीरने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली होती. ‘’मी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मिळावं यासाठी प्रार्थना करतो. तसेच यासाठी जबाबदार असलेल्यांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल. भारत हल्ला करणार’’, असे गौतम गंभीरने या संदर्भात केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते.