Join us

IPL 2025: "निवृत्त कधी व्हायचं हे मी ठरवणार नाही, तो निर्णय..."; MS Dhoni ने सोडले मौन

MS Dhoni Retirement, CSK IPL 2025: गेल्या सामन्यात धोनीचे आईवडील सामना पाहायला आल्याने निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:14 IST

Open in App

MS Dhoni Retirement CSK : IPL 2025 मध्ये दिग्गज महेंद्रसिंग धोनीने चार सामन्यांत केवळ ७६ धावा केल्या. चौकार-षटकार मारणे त्याला कठीण जात आहे. यामुळे त्याच्या निवृत्तीची पुन्हा चर्चा सुरू झाली. यावर चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की धोनी खेळण्यासाठी फिट आहे. निवृत्तीसंदर्भात धोनीशी आपली काहीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

४३ वर्षीय धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण तो अद्यापही आयपीएलमध्ये सक्रिय आहे. शनिवारी चेपॉकवर धोनीचे आई-वडील पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी हजर होते. त्यामुळे त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीबद्दलही चर्चाना उधाण आले होते. तथापि, आता धोनीने स्वतःच्या निवृत्तीबद्दल केलेले भाष्य बोलके ठरले आहे. माही आता 'फिनिशर' राहिला नाही; त्याच्या फलंदाजी क्रमामुळे संघाला नुकसान होते. राज शमानीच्या नव्या पॉडकास्टमध्ये धोनीने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या पॉडकास्टमध्ये धोनीने सांगितले की, आयपीएल २०२५ नंतर लगेचच निवृत्ती घेण्याचा विचार करीत नाही. तंदुरुस्तीचा विचार करून पुढचा हंगाम खेळायचा की नाही, हे ठरवेन.

कधी निवृत्ती घेणार?

निवृत्तीबद्दल तो म्हणाला, "नाही, सध्या तरी नाही. मी अजूनही आयपीएल खेळत आहे. मी या गोष्टी खूप सोप्या ठेवल्या आहेत. मी एकावेळी एकाच वर्षाचा विचार करतो. मी ४३ वर्षाचा आहे आणि जेव्हा आयपीएल २०२५ स्पर्धा संपेल, त्यानंतर मी काही महिन्यात ४४ वर्षांचा होणार आहे. त्यानंतर माझ्याकडे खेळायचे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी १० महिने असतील. हा निर्णय मी नाही, तर माझे शरीरच घेईल. त्यामुळे सध्यातरी एकाच वर्षाचा विचार करीत आहे, त्यानंतर पुढचा विचार करेन."

धोनीने ५०० हून अधिक सामने खेळताना १७हजारांहून अधिक धावाही केल्या. आयपीएलमध्ये २६८ सामने खेळले असून २४ अर्धशतकांसह ५३१९ धावा केल्या. त्याने यष्टिरक्षक म्हणून १९४ बळी घेतले आहेत. यामध्ये १४९ झेल आणि ४५ यष्टिचीतचा समावेश आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स