Harbhajan Singh on Virat Kohli, Team India for T20 World Cup 2024: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या त्याच्या दमदार IPL फॉर्ममुळे चर्चेत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर १ जूनपासून अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर T20 वर्ल्डकप रंगणार आहे. या वर्ल्डकपसाठी सर्वच संघ तयारी करत आहेत. IPL ही T20 World Cup साठी रंगीत तालीम सुरु आहे. यंदाच्या स्पर्धेत अनेक नवनवीन खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. तसेच भारताकडून आधी खेळलेले काही खेळाडूदेखील आपला फॉर्म दाखवत संघात स्थान मिळवण्यासाठी दावा सांगत आहेत. अशाच एका खेळाडूसाठी विराट कोहलीने फलंदाजीतील आपल्या तिसऱ्या क्रमांकाचे बलिदान द्यावे, असे मत दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने व्यक्त केले आहे.
"सध्याच्या घडीला टीम इंडियातील बरेचसे खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. अशा वेळी यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने ओपनिंग करावी आणि विराट कोहलीने तीन नंबरवर खेळायला यावं. पण माझा विराटला एक वेगळा सल्लादेखील आहे. जर भारताला उजव्या-डाव्या फलंदाजांचे कॉम्बिनेशन खेळवायचे असेल तर एक चांगला पर्याय आहे. पहिल्या ६-७ षटकांचा खेळ झालेला असेल आणि आपल्याकडे शिवम दुबेसारखा खेळाडू असेल तर विराटने तिसऱ्या क्रमांकाची जागा दुबेसाठी सोडावी आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर स्वत: खेळावं," असा सल्ला हरभजन सिंहने दिला.
"शिवम दुबे तीन नंबरला खेळला आणि विराट चौथ्या नंबरला खेळायला आला तरी असे केल्याने कोहलीचा कुठेही अपमान होण्याचा प्रश्न येत नाही. आपल्याला संघासाठी आणि त्यावेळच्या सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजी ठरवावी लागेल. कोहली हा एक प्रतिभावान फलंदाज आहे. त्यामुळे तो ३ किंवा ४ नंबरवर खेळल्याने काहीही फरक पडणार नाही. कारण तो देशासाठी खेळतो. तुम्ही जरी हा प्रश्न त्याला जाऊन विचारलात तर तो देखील हेच म्हणेल की संघासाठी काहीपण," असा विश्वास हरभजन सिंगने व्यक्त केला.
दरम्यान, BCCI कडून १ मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कोणत्या खेळाडूंना संघात स्थान मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.