नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँ गंभीर आरोप करताना दिसत आहे. शुक्रवारी तर हसीनने त्याच्यावर देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पण तिच्या या आरोपावर शामीने आपली भूमिका मांडली आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
" शामीने पाकिस्तानच्या अलिशबा या प्रेयसीकडून काही पैसे घेतले होते. या गोष्टीचे पुरावेही माझ्याकडे आहेत. तो जर मला फसवू शकतो, तर तो देशाचीही फसवणूक करू शकतो," असा गंभीर आरोप हसीनने शामीवर केला आहे.
या आरोपांवर शामीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तो म्हणाला की, " मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. हसीन माझ्यावर असे आरोप का करत आहे, हे मला माहिती नाही. तिच्या आरोपांमुळे मी आणि कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिने देशाला फसवल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. भारताची फसवणूक करण्यापूर्वी मी जीव देईल."