ट्वेन्टी-२० वर्ल्डकपच्या (T20 World Cup 2021) पहिल्याच लढतीत भारतीय संघाला (Team India) पाकिस्तान विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाच्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला सोशल मीडियात जोरदार ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले, तर काहींनी शमीच्या धर्मावरुन टीका केली. इतकंच काय तर काहींनी शमीला पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्लाही दिला. शमीला सोशल मीडियात जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असताना अनेक दिग्गज खेळाडू आणि राजकीय नेतेही पुढे आले व शमीला पाठिंबा देऊ केला. शमीवर केली जाणारी टीका अत्यंत दुर्दैवी असल्याचं अनेकांनी म्हटलं. यातच शमीचे काही जुने व्हिडिओ देखील समोर आले. मोहम्मद शमीची मुलगी आजारी असतानाही तो देशासाठी खेळत असल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आता शमीचा आणखी एक व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
"देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन", अशी भावना मोहम्मद शमीनं एका मुलाखतीत व्यक्त केली होती. मोहम्मद शमीच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करणाऱ्या ट्रोलर्ससाठी शमीचा हा व्हिडिओ सडेतोड उत्तर देणार आहे. २०१८ साली शमीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्याची पत्नी हसीन जहाँनं घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले होते. याच आरोपांवर शमीनं एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
"चुकून जरी माझ्या मनात देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न आला तर मी मरणं पसंत करेन, पण मी देशाला धोका देऊ शकत नाही", असं मोहम्मद शमीनं म्हटलं होतं.