लंडन : टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या संघांची संख्या लवकरच १६ वरून २० इतकी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०२३ ते २०३१ या काळात होणाºया टी२० विश्वचषकासाठी सहभागी संघांची संख्या वाढवण्याचा विचार केला जात आहे.क्रिकेटची व्याप्ती वाढवण्यासाठी टी२० सर्वोत्तम माध्यम आहे, त्यामुळे टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होणाºया संघांची संख्या वाढवण्याचा विचार आयसीसी करीत आहे.
फुटबॉल आणि बास्केटबॉलप्रमाणेच क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचा आयसीसीकडून प्रयत्न केला जात असून एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार २०२३ ते २०३२ या कालावधीत होणाºया आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकात याचा विचार केला जाणार आहे. या काळातील पहिली टी २० विश्वचषक स्पर्धा २०२४ मध्ये होणार असून त्यात २० संघांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
२०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या प्रसारणाचे अधिकार देण्याआधी प्रत्येक वर्षी एका विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. विश्वचषक स्पर्धांमध्ये संघांची संख्या वाढली, तर प्रेक्षकांची संख्या अधिक होईल आणि त्याचा लाभ आयसीसीला होऊ शकेल. मोठ्या स्पर्धांमध्ये अमेरिकेसारख्या देशांना प्रतिनिधित्व मिळण्याची संधी असू शकेल. कारण अमेरिका ही खूप मोठी बाजारपेठ आहे, पण तेथे अद्यापही क्रिकेटचा हवा तसा प्रसार झालेला नाही.