Join us  

आयसीसी म्हणते, महेंद्रसिंग धोनीचा नाद करायचा नाय!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा खेळ संथ झालाय, अशी बोंब मारणाऱ्यांना माहीनं कामगिरीतून चोख उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:35 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा खेळ संथ झालाय, अशी बोंब मारणाऱ्यांना माहीनं कामगिरीतून चोख उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतकं आणि सामनावीराचा किताब त्याने पटकावला. फलंदाजीतच नव्हे तर यष्टिमागे त्याने दमदार कामगिरी करताना टीकाकारांची बोलती बंद केली. न्यूझीलंड दौऱ्यातही याची प्रचिती आली. संघ अडचणीत असताना सहकाऱ्यांना वेळोवेळी त्याने केलेले मार्गदर्शन किती उपयुक्त ठरले, याबाबत वेगळे सांगायला नको. तिशीपल्ल्याड धोनी यष्टिमागे अजूनही तितक्याच अचुकपणे व वेगाने भूमिका पार पाडत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) धोनीचा नाद करायचा नाय, असा सल्ला दिला आहे. आयसीसीचा हा ट्विट चांगलाच व्हायरल होत आहे.पाचव्या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये फारशी चुणूक दाखवता आली नाही. पण यष्टीरक्षण करताना मात्र त्याने अद्भूत अशीच कामगिरी केली. भारतीय संघ पुन्हा एकदा अचडणीत सापडला असताना कर्णधार रोहित शर्माने केदार जाधवला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले. केदारने 37व्या षटकात जेम्स निशामच्या विरोधात पायचीतचे अपील केले. यावेळी पंचांनी हे अपील फेटाळले. धोनीनेही सुरुवातीला अपील केले खरे, पण त्यानंतर तो चेंडू घेण्यासाठी धावला. धोनी चेंडूपर्यंत पोहोचत असताना न्यूझीलंडचे फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धोनीने चतुराई दाखवली आणि चपळतेने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकला. धोनीने नेमके काय आणि कसे केले हे कुणालाही कळले नाही. अखेर तिसऱ्या पंचांना विचारणे करण्यात आली आणि धोनीने निशामला रन आऊट केल्याचा निर्णय दिल्या.  आमचे आयुष्य सुखदायक होण्यासाठी आम्हाला सल्ला द्या, असे ट्विट एका क्रिकेटप्रेमीने आयसीसीला विचारले त्यावर आयसीसीने उत्तर दिले की,'' महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षण करत असताना क्रिज सोडू नकोस.'' आयसीसीचा हा सल्ला 7098 लोकांनी रिट्विट केला, तर 22826 जणांनी त्याला लाईक्स केले.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीआयसीसी