Join us  

निवृत्तीनंतर Dinesh Karthik ने स्वीकारली जबाबदारी; T20 WC साठी अमेरिकेत दिसणार

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याने नुकतीच इंडियन प्रीमिअर लीगमधूनही निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 4:01 PM

Open in App

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याने नुकतीच इंडियन प्रीमिअर लीगमधूनही निवृत्ती जाहीर केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्तिकने आयपीएल २०२४ ही त्याची शेवटची असेल असे जाहीर केले होते. राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतर कार्तिकने भरलेल्या नयनांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर काय करायचे, याचे नियोजन कार्तिकने काही वर्षांपूर्वीच केले होते. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कार्तिक नवीन जबाबदारीत दिसणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी समालोचकांचे पॅनल आज जाहीर केले. १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.  या स्पर्धेसाठी रवी शास्त्री, नासेर हुसैन, इयान स्मिथ, मेल जोन्स, हर्षा भोगले आणि इयान बिशॉप या दिग्गज समालोचकांचे पॅनल आधीच जाहीर केले होते. त्यात आणखी काही नावं आज जोडली गेली आहेत. यामध्ये दिनेश कार्तिक, इबॉनी रेनफोर्ड-ब्रेंट, सॅम्युएल बद्री, कार्लोस ब्रेथवेट, स्टीव्ह स्मिथ, आरोन फिंच व लिसा स्थळेकर या पुरुष व महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. 

वन डे वर्ल्ड कप विजेता रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, रमीझ राजा, इयॉन मॉर्गन, टॉम मुडी व वसीम अक्रम हेही आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या एक्स्पर्ट पॅनेलमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय डेल स्टेन, ग्रॅमी स्मिथ, मिचेल अॅथर्टन, वकार युनीस, सायमन डल, शॉल पोलॉक आणि कॅटी मार्टीन हेही आहेत. दिनेश कार्तिक म्हणाला, ही स्पर्धा अनेक कारणांनी वेगळी आहे आणि त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. २० संघ, ५५ सामने आणि काही नवीन ठिकाणं... हे सर्व रोमांचकारी आहे आणि मी त्याची आतुरतेनं वाट पाहतोय. या स्पर्धेसाठी समालोचकाच्या भूमिकेची संधी मिळाल्याचा आनंद आहे.  

१७ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दिनेश कार्तिकला केवळ एका हंगामात ५०० हून अधिक धावा करता आल्या. त्याने २०१३ मध्ये मुंबईकडून खेळताना ही किमया साधली होती. पहिल्या फळीत फलंदाजीची संधी मिळाल्याने कार्तिकला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळला. दिनेश कार्तिक दिल्ली डेयरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सहा संघाकडून खेळला आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण २५७ सामने खेळले असून, ४८४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला २२ अर्धशतके झळकावता आली.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024दिनेश कार्तिक