Join us  

ICC ची मोठी घोषणा; महिला व पुरुष संघांना मिळणार समान बक्षीस रक्कम, जय शाह म्हणाले.... 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज मोठी घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 7:58 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज मोठी घोषणा केली. आता आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पुरुष व महिला संघांना समान बक्षीस मिळणार आहे आणि कसोटी क्रिकेटमधील ओव्हर्स-रेटच्या नियमातही बदल केले जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आयोजित आयसीसीच्या वार्षिक परिषदेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. संघांना आता आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ज्या पोझिशनमध्ये संघ राहिल त्यांना समान बक्षीस रक्कम तसेच त्या स्पर्धांमध्ये सामना जिंकण्यासाठी समान रक्कम मिळेल. 

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, "आमच्या खेळाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे आणि मला आनंद होत आहे की आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेणारे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना आता समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे." २०१७ पासून आम्ही समान बक्षीस रकमेपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी महिलांच्या स्पर्धांमध्ये बक्षीस रक्कम वाढवली आहे. इथून पुढे आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यास आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याइतकीच बक्षीस रक्कम असेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतही हाच नियम असेल.  

"क्रिकेट हा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक खेळ आहे आणि ICC बोर्डाचा हा निर्णय याला बळकटी देतो. आम्ही प्रत्येक खेळाडूच्या या खेळातील योगदानाचा तितकाच सन्मान करण्यास आणि त्याचे कौतुक करण्यास सक्षम आहोत,''असेही ते म्हणाले. ICC महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२० आणि २०२३ मधील विजेते आणि उपविजेत्यांना अनुक्रमे १ दशलक्ष डॉलर आणि ५ लाख डॉलर मिळाले, जे २०१८ मध्ये दिलेल्या रकमेच्या पाच पट होते. 

ओव्हर-रेट नियमात बदल मुख्य कार्यकारी समितीने ओव्हर-रेट राखणे आणि खेळाडूंसाठी योग्य मोबदला सुनिश्चित करणे यामधील समतोल साधण्यासाठी कसोटी क्रिकेटमधील ओव्हर-रेट प्रतिबंधांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या सुरुवातीपासून लागू होणाऱ्या सुधारित नियमांनुसार खेळाडूंना कमी पडलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या ५% इतका दंड आकारला जाईल तो कमाल दंड ५०% पर्यंत मर्यादित असेल. जय शाह म्हणाले...लैंगिक समानता आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ICC स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिलांसाठी बक्षिसाची रक्कम समान असतील. हा महत्त्वपूर्ण प्रयत्न साध्य करण्यात मदत केल्याबद्दल मी सहकारी मंडळ सदस्यांचे आभार मानतो. चला अशा भविष्यासाठी काम करूया जिथे क्रिकेट जगभर वाढत राहील. 

टॅग्स :आयसीसीवन डे वर्ल्ड कप
Open in App