दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने डोपिंग प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जुबैर हामजा याच्यावर ९ महिने क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. हामजा याने दक्षिण आफ्रिकेच्या पार्लमध्ये १७ जानेवारी २०२२ रोजी स्पर्धेव्यतिरिक्त ठिकाणी नमुने दिले होते. त्यामध्ये फुरेसेमाईट या प्रतिबंधक पदार्थाचे अंश सापडले होते. त्यामुळे त्यांच्यावर २२ मार्च २०२२ पासून निर्बंध घालण्यात आले आहेत. ते २२ डिसेंबर २०२२ पर्यंत कायम राहणार आहेत. तसेच १७ जानेवारी ते २२ मार्च या काळातील त्यांची कामगिरी अमान्य ठरली आहे.
जुबैर हामजाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी ६ कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. दरम्यान, हामजा याला प्रतिबंधांच्या काळात जमवलेल्या ३१ धावा गमवाव्या लागणार आहेत. २६ वर्षीय हामजाची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कामगिरी जबरदस्त झाली आहे. त्याने ७८ सामन्यातील १३० डावांत ४६ च्या सरासरीने ५२७१ धावा जमवल्या आहेत. त्यात १३ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद २२२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
दरम्यान, जुबेर हामजाला कसोटीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने ६ कसोटी सामन्यांमधील १२ डावांत १८ च्या सरासरीने २१२ धावा जमवल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर एका एकदिवसीय सामन्यात ५६ धावा जमवल्या आहेत. तर त्याने २० टी२० सामन्यांमध्ये त्याने ३१ च्या सरासरीने ५३९ धावा जमवल्या आहेत. त्याने १०४ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. मात्र आता त्याला क्रिकेट खेळता येणार नाही.