नवी दिल्ली : २०२३चा आशिया चषक पाकिस्तानातच व्हावा आणि भारतीय संंघाने त्यात सहभागी व्हावे, हे बीसीसीआयला ठासून सांगण्याची हिंमत आयसीसी दाखविणार नाही. कारण ते बीसीसीआयच्या ताटाखालबचे मांजर आहेत, असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने केले आहे.
उभय देशांतील राजकीय संबंध विकोपाला गेल्याने भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. यामुळे वर्षाअखेरीस होणाऱ्या आशियाई स्पर्धेच्या यजमानपदावर प्रश्नचिन्ह लागले आहे. ही स्पर्धा भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या काही दिवस आधी खेळविली जाईल. पाकिस्तानने प्रत्युत्तरात भारतातील वन डे विश्वचषकावर बहिष्काराची धमकी दिली. आफ्रिदी म्हणाला, ‘भारत आशिया चषकासाठी पाकिस्तान दौरा करेल, याबद्दल मला शंका वाटते. आम्हीदेखील भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकू? मात्र, कधी ना कधी यावर निर्णय घ्यावा लागेल. याप्रकरणी आयसीसीची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यांनी पुढाकार घ्यावा. पण, एक स्पष्ट आहे की, आयसीसीदेखील बीसीसीआयपुढे हतबल असून, काहीच करू शकणार नाही.
बीसीसीआयने स्वत:ला इतके बलाढ्य करून घेतले की, त्यांचे वर्चस्व स्थापन झाले. इतर देश स्वबळावर उभे राहू शकत नसतील तर मोठे निर्णय घेणे सोपे नसते. भारत जर डोळे दाखवत असेल तर त्यांची बाजू भक्कम आहे, असे समजा. आयसीसीला बीसीसीआय कधीही वाकवू शकते.