Join us  

अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवर चर्चा; आयसीसीची आज बैठक

कार्यसूचीमधील एकमेव मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 1:20 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सोमवारी होणाऱ्या बैठकीत अध्यक्ष नियुक्ती करण्याचा एकमेव मुद्यावर चर्चा होईल. यावेळी अध्यक्षपदाच्या नामांकन प्रक्रियेला अंतिम रूप देण्याबाबत निर्णय होईल. अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया चार आठवड्यात पूर्ण करण्यात येईल, अशी आशाही व्यक्त होत आहे.आयसीसीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आयसीसीच्या सोमवारी होणाºया बैठकीच्या कार्यसूचीमध्ये केवळ अध्यक्षपदाच्या नामांकन प्रक्रियेचा समावेश आहे. या पदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी साधारणपणे दोन आठवड्यांचा अवधी दिला जातो.’ आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेत दोन-तृतियांश बहुमताची आवश्यकता असते. मात्र बोर्डातील काही सदस्यांच्या मते, १७ सदस्यांच्या सहभागात या पदाचा निर्णय साधारण बहुमताने व्हावा.आयसीसीच्या या १७ बोर्ड सदस्यांमध्ये कसोटी क्रिकेट खेळणारे १२ देश, तीन सहयोगी देश (मलेशिया, स्कॉटलँड आणि सिंगापूर), अध्यक्ष (निवडप्रक्रियेत अंतरिम) आणि स्वतंत्र निर्देशक (इंद्रा नूई) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी हेही आयसीसी बोर्डचे सदस्य आहे, मात्र त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार नाही.अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून सिंगापूर क्रिकेट बोर्डचे चेअरमन इम्रान ख्वाजा यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर इतर उमेदवारही या शर्यतीत आहेत. परंतु, कोणत्याही उमेदवाराला सार्वमत मिळत नसल्याने नवा अध्यक्ष जाहीर करण्यास वेळ लागत आहे. आयसीसीचे संभाव्य अध्यक्ष म्हणून इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष कॉलिन ग्रेव्स यांचे नाव आघाडीवर असून वेस्ट इंडिज क्रिकेटचे माजी अध्यक्ष डेव कॅमरन यांनीही या पदासाठी उत्सुकता दाखवली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे कॅमरन यांना विंडीज क्रिकेट बोर्डाचाच पाठिंबा नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (सीएसए) ख्रिस नेंजानी यांनीही या पदासाठी आपले नाव पुढे केले आहे. (वृत्तसंस्था)सौरव गांगुली यांच्यावर नजरदक्षिण आफ्रिकेचा निर्देशक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने आयसीसी अध्यक्षपदासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पाठिंबा दर्शविला. सीएसएचे ख्रिस नेंजानी यांच्यासह स्मिथचे संबंध चांगले नसल्यानेच त्याने गांगुली यांना पाठिंबा दिला. त्यामुळेच या शर्यतीमध्ये गांगुली यांच्यावरही लक्ष असेल. त्याच वेळी बीसीसीआय आयसीसीच्या सर्वोच्च पदासाठी गांगुली यांच्या नावाची शिफारस करणार का, हेही पाहावे लागेल.

टॅग्स :आयसीसी