नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला आता आयसीसीनेही दणका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या सामन्याची शंभर टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यातही येणार आहे. स्मिथबरोबर चेंडूशी छेडछाड करणाऱ्या कॅमेरून बेनक्रॉफ्टवरही आयसीसीने कारवाई केली आहे. बेनक्रॉफ्टला आयसीसीने 3 डिमेरीट अंक दिले आहेत, त्याचबरोबर त्याच्या सामन्याच्या मानधनातील 75 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.
स्मिथला या प्रकरणाची चांगलीच शिक्षा भोगावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघानेही त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. त्यानंतर आता आयसीसीने त्याला तिसरा धक्का दिला आहे.
काय आहे प्रकरणकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.