आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. खास करून भारतीय सामन्यांच्या नियोजनातील प्रमुख अडथळ्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ११ नोव्हेंबरला लाहोरमध्ये आगामी स्पर्धेसंदर्भातील घोषणा करण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. यासाठी आयसीसीची एक टीम पाकिस्तानात दाखलही झाली होती. पण भारतीय संघाने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिल्याचं वृत्त समोर येताच आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भातील प्रस्तावित वेळापत्रक निर्थक ठरल्याचा सीन निर्माण झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात ICC अजूनही वेट अँण्ड वॉच भूमिकेत
क्रिकबझनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, "अद्याप आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भातील कार्यक्रमाची कोणतीही पुष्टी झालेली नाही. आयसीसी अजूनही यजमान आणि सहभागी क्रिकेट बोर्डांशी या स्पर्धेतील नियोजनासंदर्भात चर्चा करत आहोत. सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यावर या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भातील माहिती आयसीसीकडून शेअर केली जाईल." अशी माहिती या घडामोडींशी संबंधित एका अधिकाऱ्यानं दिली आहे. आयसीसी सदस्यांचा पाकिस्तान दौरा हा वेळापत्रक निश्चित करण्याच्या उद्देशाने नसून तो स्पर्धेच्या ब्रँडिंगचा एक भाग होता. लाहोरमधील परिस्थितीही बिकट असल्याचा उल्लेख संबंधित अधिकाऱ्याने केला आहे.
या गोष्टीनंही वाढवलंय यजमान पाक क्रिकेट बोर्डाचं टेन्शन
आयसीसी संबंधित कार्यक्रमाची रुपरेषा अंतिम करण्यासाठी अधिक वेळ घेण्यामागच्या प्रमुख कारणामध्ये लाहोरमधील सध्याचे वातावरणही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. लाहोर शहर पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने प्राथमिक शाळांना आठवड्याभराची सुट्टीही दिल्याचे समजते.
टीम इंडियामुळे पाक पुन्हा अडचणीत
एका बाजूला PCB नं प्रस्ताविक वेळापत्रक तयार करून भारतीय संघ पाकिस्तानत येऊन खेळेल, यावर ठाम होता. दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पाकमध्ये खेळण्यास आपला नकार आयसीसीला आधीच कळवल्याची गोष्ट समोर आली होती. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यासंदर्भात आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे ते म्हणाले होते. सध्याच्या परिस्थिती पाहता यजमानपद मिरवताना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाक क्रिकेट बोर्डाला २०२३ मधील आशिया चषक स्पर्धेप्रमाणे ‘हायब्रीड मॉडेल’शिवाय अन्य पर्याय उरलेला नाही, असेच दिसते.