Join us  

आयसीसी सीईओ मनू साहनी राजीनामा देणार?

सक्तीच्या रजेवर पाठविले : सहकाऱ्यांसोबत असभ्यपणे वागत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 1:42 AM

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) मनू साहनी यांना त्यांच्या संशयास्पद कार्यशैलीमुळे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. ते कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. आयसीसीचे ऑडिट फर्म असलेल्या प्राईस वॉटर हाऊन कूपर्सच्या अंतरिम चौकशीदरम्यान त्यांच्या वागणुकीत बेशिस्तपणा आढळून आला.

साहनी यांना आयसीसी विश्वचषक २०१९ नंतर डेव्ह रिचर्डसन यांच्या जागी २०२२ पर्यंत सीईओपदी नेमण्यात आले होते. ५६ वर्षांचे साहनी गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात येत नव्हते. मंगळवारी त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगण्यात आले. सहानी यांनी स्वत: पद सोडावे, यासाठी संचालक मंडळ तोडगा शोधण्यात व्यस्त आहे.मागच्या वर्षी नव्या चेअरमनपदाच्या निवडणुकीपासून साहनी दडपणात होते. नोव्हेंबरमध्ये ग्रेग बार्कले यांची चेअरमनपदी निवड झाली. निवडणुकीदरम्यान अंतरिम चेअरमन इम्रान ख्वाजा यांना पाठिंबा दिल्यावरून काही बोर्ड साहनी यांच्यावर नाराज आहेत. आयसीसीत सुरू असलेल्या घटनाक्रमाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यानुसार शशांक मनोहर यांचे स्थान घेण्यासाठी न्यूझीलंडचे बार्कले आणि सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांना पाठिंबा देणे काही बोर्डांना आवडले नव्हते. आयसीसीच्या पुढील स्पर्धांच्या यजमानपदासाठी बोली लावताना रक्कम भरण्याचा आयसीसीने जो निर्णय घेतला, त्यमागे साहनी यांचे डोके होते. याशिवाय २०२३ ते २०३१ या कालावधीत आयसीसीची दरवर्षी किमान एक स्पर्धा आयोजित व्हावी, या प्रस्तावाचेदेखील साहनी यांनी समर्थन केले होते. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने याचा विरोध केला होता.

हे आहेत आरोप... आयसीसीच्या धोरणासंदर्भात विविध निर्णय घेताना त्यांचे काही प्रभावी क्रिकेट बोर्डासोबत बिनसले होते. सहकारी कर्मचाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देतात. त्यांच्या बेजबाबदार वागणुकीचे पुरावे अनेक कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य टिकविण्याच्या दृष्टीने साहनी यांची वागणूक योग्य नाही. साहनी हे दडपण कायम करून काम करतात. रिचर्डसन यांच्यापेक्षा त्यांची ही शैली वेगळी आहे.

बिग थ्रींची भूमिका निर्णायकसाहनी यांनी स्वत: राजीनामा न दिल्यास संचालक मंडळ त्यांना हटविण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. आयसीसीचे १७ सदस्य आहेत. साहनी यांच्या बाजूने नऊ तर विरोधात आठ सदस्य असू शकतील. साहनी यांना पदमुक्त करण्यासाठी १७ पैकी १२ मतांची गरज भासेल. त्यांच्या नियुक्तीला बोर्डाने बहुमताने मंजुरी दिली होती . ‘बिग थ्री’गटाला साहनी यांना हटविण्यात यश येते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीभारतीय क्रिकेट संघ