आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी कार्यकाळ संपल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. ३० नोव्हेंबरला ते या पदभाराच्या जबाबदारीतून मोकळे होतील. त्यानंतर आयसीसीचा नवा अध्यक्ष कोण? अशी चर्चा चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगताना दिसत आहे. यात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येते. जर त्यांनी आयसीसीचा बॉस होण्यासाठी फिल्डिंग लावली आणि ते जिंकले तर एक नवा इतिहास रचला जाईल. जाणून घेऊयात जय शहा यांना खुणावणाऱ्या त्या खास विक्रमाबद्दल
आणखी एका कार्यकाळासाठी पात्र असताना बार्कले यांनी घेतलीये माघार
ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर जय शहा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हा पहिला प्रश्न. याचे उत्तर २७ ऑगस्टपर्यंत मिळेल. कारण ही निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची शेवटची तारीख आहे. नियमानुसार, एखादी व्यक्ती आयसीसी अध्यक्षपदी दोन-दोन वर्षांचे तीन कार्यकाळ पार पाडू शकते. पण बार्कले यांनी दोन टर्मनंतर माघार घेतली आहे. ते तिसऱ्या कार्यकाळासाठी तयार नसल्यामुळे आता जय शहा हे नवे अध्यक्ष होतील, अशी चर्चा रंगू लागली आहे.
निवडणुक झाली तर असं सेट केलं जातं बहुमताचं समीकरण
आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला १६ पैकी ९ मतांसह बहुमताचा आकडा गाठावा लागतो. सध्याच्या घडीला जय शहा हे आयसीसीच्या आर्थिक आणि वाणिज्य संबंधित उपसमितीचे प्रमुख आहेत. जर ते मैदानात उतरले तर त्यांची अगदी सहज आयसीसीच्या नव्या बॉसच्या रुपात वर्णी लागू शकते.
जय शहा यांना खुणावतोय हा विक्रम
जर जय शहा या आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाले आणि ते या पदावर विराजमान झाले तर एक नवा विक्रम ते सेट करतील. आयसीसीचा सर्वात युवा अध्यक्ष होण्याची त्यांना संधी आहे. त्यांचे सध्याचे वय ३५ वर्षे इतके आहे. याआधी जगमोहन डालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यासारख्या भारतीयांनी आयसीसीचे अध्यक्षपदाची जबाबदारी पाहिली आहे.