जोस इंग्लिसच्या भात्यातून आलेल्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्लंडनं सेट केलेल्या विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून दाखवत नवा इतिहास रचला आहे. आयसीसीच्या स्पर्धेतीस आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघानं ३५० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केला आहे. हा एक नवा विक्रमच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोस इंग्लिसची मॅच विनिंग सेंच्युरी; ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना बेन डकेटच्या दीड शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३५१ धावा केल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या होती. जोस इंग्लिसची कडक सेंच्युरी आणि मॅथ्यू शॉर्ट आणि कॅरीच्या फिफ्टीच्या मदतीने ऑस्ट्रेलियानं विक्रमी विजयाला गवसणी घालत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
इंग्लंडकडून दोघांनी केली दमदार बॅटिंग
पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. ४३ धावांवर संघानं २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर बेन डकेट याने दमदार शतकी खेळी करत संघाला सावरले. त्याने १४३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १६५ धावांची खेळी केली. याशिवाय जो रुटनं ७८ चेंडूत ६८ धावा केल्या. या दोघांच्या खेळीशिवाय इंग्लंडच्या ताफ्यातून अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण त्यातही इंग्लंडच्या संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियासमोर३५२ धावांचे चॅलेंजिग टार्गेट सेटे केले होते.
हेड, स्मिथ स्वस्तात आटोपल्यावर मार्नस-मॅथ्यू जोडी जमली, पण...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलामीची लढत जिंकण्यासठी ऑस्ट्रेलियाला विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करून नवा विक्रम सेट करण्याचे चॅलेंज होते. ट्रॅविस हेड आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ स्वस्तात तंबूत परतल्यामुळे सामना इंग्लंडच्या बाजून झुकतोय असं वाटत होते. संघ अडचणीत असताना मॅथ्यू शॉर्ट ६३ (६६) आणि मार्नस लाबुशेन ४७ (४५) या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेन आउट झाल्यावर मॅथ्यू शॉर्टही चालता झाला अन् सामना पुन्हा इंग्लंडच्या बाजूनं फिरला.
दोन विकेट किपरची जबरदस्त बॅटिंग अन् पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून सेट झाला सामना
२३ व्या षटकात ऑस्ट्रेलियन संघानं मॅथ्यू शॉर्टच्या रुपात चौथी विकेट गमावली. त्यावेळी संघाच्या धावफलकावर १३६ धावा होत्या. त्यानंतर जोस इंग्लिस आणि अॅलेक्स कॅरी जोडी सेट झाली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत हातून निसटत असलेला सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरवला. कॅरी ६३ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ६९ धावा काढून बाद झाला. मग अखेरच्या षटकात आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करत जोस इंग्लिसनं आणखी आक्रम अंदाजात बॅटिंग केली. त्याला ग्लेन मॅक्सवेलनं त्याची पार्टी जॉइन केली आणि ऑस्ट्रेलियानं १५ चेंडू आणि ५ विकेट राखत विक्रमी धावसंखेचा यशस्वी पाठलाग केला. जोस इंग्लिसनं ८६ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने नाबाद १२० धावांची मॅच इनिंग खेळी केली. दुसरीकडे मॅक्सवेल १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३२ धावांवर नाबाद राहिला.