चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 'ब' गटातील दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील रावळपिंडीच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले आहे. पावसामुळे हा सामना शेवटी रद्द करण्यात आला असून दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आलाय. एक विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ गटात प्रत्येकी ३-३ गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शेवटचा सामना जिंकून या दोन्ही संघांना थेट सेमीत धडक मारण्याची संधी आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचा मार्ग थोडा खडतर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसी स्पर्धा आणि पावसामुळे खेळ खंडोबा हे दक्षिण आफ्रिकेच्या पाचवीला पुजल्यागत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा पावसामुळे त्यांचा डाव अर्ध्यावर मोडणार का? असा प्रश्न ऑस्ट्रेलिया विरुद्धचा त्यांचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पडतो. ऑस्ट्रेलियाचा पेपर कसा सोपा आहे? आणि दक्षिण आफ्रिकेसाठी काय आव्हान आहे ते समजून घेऊयात
इंग्लंड-अफगाणिस्तान यांच्यात कोण उघडणार खाते?
'ब' गटातील पुढचा सामना अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. या सामन्यात एका संघाचे खाते उघडणार हे निश्चित आहे. जर हा सामना इंग्लंडनं जिंकला तर दक्षिण आफ्रिकेचे टेन्शन वाढेल. दुसरीकडे अफगाणिस्तानचा विजय ऑस्ट्रेलियावर सोप्या पेपरसाठी चांगला अभ्यास करण्याची वेळ आणेल.
...तर इंग्लड इन अन् दक्षिण आफ्रिका आउट असा दिसेल सीन
जर इंग्लंडनं हा सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात २ गुण जमा होतील. या स्पर्धेतील अखेरचा सामना ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना जिंकून ४ गुणांसह त्यांना ते सेमीसाठी दावेदारी ठोकता येईल. या परिस्थितीत गुणतालिकेत आपल्या गटात टॉपवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की येऊ शकते.
अफगाणिस्तानच्या संघालाही चमत्कार दाखवण्याची संधी
अफगाणिस्तानचा संघ हा चमत्कारिक संघ म्हणून ओळखला जातो. अनेकदा त्यांनी मोठ्या संघांना पराभूत करून दाखवले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडशिवाय ते ऑस्ट्रेलियाला भिडणार आहेत. इंग्लंडला मात देऊन त्यांनी ऑस्ट्रेलिला नमवले तर या परिस्थितीत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे दोनसंघ सेमीसाठी पात्र ठरू शकतात. पण इंग्लंडनं उर्वरित दोन सामन्यापैकी एक आणि अफगाणिस्तानच्या संघानं एक सामना जरी गमावला तर या गटातून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सेमीसाठी पात्र ठरतील.