आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मार्को यान्सेन आणि मुल्डर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या १७९ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी ३ तर केशव महाराजने २ विकेट्स घेतले. इंग्लंडकडून जो रूट याने सर्वाधिक ३७ धावा काढल्या. दरम्यान, इंग्लंडचा डाव १७९ धावांत आटोपल्याने दक्षिण आफ्रिकेचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे.
स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या इंग्लंडने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदांजांनी भेदक गोलंदाजी करून इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. मार्को यान्सेनने फिल सॉल्ट (८), जेमी स्मिथ (०) आणि बेन डकेट (२४) यांना बाद करत इंग्लंडची अवस्था ३ बाद ३७ अशी केली. त्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रुक यांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रुक (१९) आणि रूट (३७) हे बाद झाल्यानंतर इंग्लंडची फलंदाजी पुन्हा कोलमडली.
तळाच्या फळीत जोस बटलर (२१) आणि जोफ्रा आर्चर (२५) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यामुळे इंग्लंडचा डाव अखेरीस ३८.२ षटकांमध्ये १७९ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी ३ तर केशव महाराजने २ विकेट्स घेतले. तर लुंगी एन्डिगी आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.