दुबई : अपराजित भारतीय संघ आता फिरकी गोलंदाजी अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यावर लक्ष केंद्रित करेल. आतापर्यंत वगळण्यात आलेल्या खेळाडूंना रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटच्या गट सामन्यात संधी मिळू शकते. अखेरचा गट सामना जिंकल्यास भारतीय संघ 'ए' गटात अव्वल स्थानावर जाईल. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल आणि दोघांकडेही उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सँटनर, ब्रेसवेलचे आव्हान
बांगलादेशचे फिरकीपटू मेहदी हसन मिराज आणि रिशाद हुसेन यांच्याविरुद्ध भारताच्या स्टार फलंदाजांनी जोखीम न घेण्याची रणनीती अवलंबली. त्यांनी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदविरुद्धही हीच रणनीती अवलंबली. आणि तिन्ही गोलंदाज खूपच किफायतशीर ठरले. आता भारतीय फलंदाजांसमोर मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांचे आव्हान असेल. जी या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वांत कठीण परीक्षा असेल. दोन्ही किवी फिरकी गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि दुबईच्या खेळपट्टीवर ते अधिक प्रभावी ठरू शकतात.
शमीच्या जागी अर्शदीप?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडकडे पाच डावखुरे फलंदाज असल्याने आणि मोहम्मद शमीला दुखापत झाली असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापन या अनुभवी वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन अर्शदीप सिंगला संधी देऊ शकते.
शुक्रवारच्या सराव सत्राचा विचार करता पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीपला शमीच्या जागी संधी मिळू शकते. त्याने गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्यासोबत खूप सराव केला आणि १३ षटके गोलंदाजी केली. २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या षटकानंतर शमीला फिजिओकडून उजव्या पायावर उपचार घ्यावे लागले होते.
गिल, कोहली, अय्यरकडून पुन्हा आशा
फॉर्मात असलेला शुभमन गिल, पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावणारा विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांना न्यूझीलंडच्या फिरकीपटूंविरुद्ध प्रभावी कामगिरी करावी लागेल. स्पर्धेपूर्वी संघात पाच फिरकीपटू निवडल्याबद्दल भारतावर टीका होत होती; परंतु येथे फिरकीपटूंच्या वर्चस्वामुळे भारताला बळकटी मिळाली आहे.
भारताने दोन सामने जिंकले आहेत; पण फिरकीपटूंनी भारतीयांना त्रस्त केले
भारताने दोन सामने जिंकले आहेत; पण फिरकीपटूंनी भारतीयांना त्रस्त केले आहे. उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड संघ याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. भारतीय फलंदाजांना फिरकीविरुद्ध एकेरी- दुहेरी धावा घेण्याची आणि वेगवान गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळण्याची सवय आहे; परंतु आता त्यांना सँटनर व ब्रेसवेलच्या २० षटकांचा सामना करावा लागेल. तसेच ग्लेन फिलिप्स हा देखील न्यूझीलंडच्या ताफ्यात एक अनियमित फिरकी गोलंदाज आहे. दुबईतील खेळपट्टी आता ताजी राहिलेली नाही. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे. भारताने जडेजा, अक्षर आणि कुलदीप यांना मैदानात उतरवले आणि ते प्रभावी ठरले आहेत.