Join us

ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर

इंग्लंडला १७९ धावांत रोखत निकालाआधी सेमीचं तिकीट मिळवल, मग दक्षिण आफ्रिकेनं अव्वलस्थानही पटकावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 20:30 IST

Open in App

हेन्री क्लासेनचा क्लास शो ६४ (५६) अन् रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याने ८७ चेंडूत केलेली नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं कराची येथील नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडला पराभूत करत 'ब' गटात अव्वल स्थान मिळवले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ११ व्या लढतीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ताज मिरवण्याचं स्वप्न आधीच उद्धवस्त झाल्यावर शेवटचा सामना जिंकून लाज राखण्याचे आव्हान घेऊन इंग्लंडचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंग्लंडचा "गिरे तो भी टांग उपर..." शो...

शेवटच्या साखळी सामन्यातही आक्रमक अंदाज अन् बेसबॉल क्रिकेटचा नाद इंग्लंडच्या अंगलट आला. प्रत्येकजण जबाबदारीचं भान विसरुन मोकाट फटकेबाजीचा छंद जोपासताना दिसले. जो रुट सोडला तर इंग्लंडच्या संघातील एकानेही मैदानात तग धरण्याचं कष्ट घेतले नाही. परिणामी एकालाही अर्धशतकापर्यंत पोचता आले नाही. जो रुटनं आपला बाज जपत केलेली ३७ धावांची खेळी सोडली तर प्रत्येकाने "गिरे तो भी टांग उपर..." शो दाखवला अन् दक्षिण आफ्रिकेसमोर त्यांचा डाव ३८.२ षटकात अवघ्या १७९ धावांत आटोपला.

इंग्लंडवर ओढावली नामुष्की; प्रवास आधीच संपलेला, इथंही पराभवाची हॅटट्रिक 

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अल्प धावांत त्यांना रोखत सामन्याचा निकाल लागण्याआधी सेमीच तिकीट मिळवलं. मग ७ विकेट राखून सामना ५ गुण आपल्या खात्यात जमा करत दक्षिण आफ्रिका संघानं 'ब' गटात अव्वलस्थानही मिळवलं. एका बाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी फेरीत अपराभूत राहिला. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या संघाचा प्रवास एकही सामना न जिंकता संपला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडनं ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. तिथं व्हाइट वॉश अन् आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अतिशय वाईट वेळ त्यांच्यावर आली.  

दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील दोघांची अर्धशतके

इंग्लंडच्या संघानं ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना कॅप्टन टेम्ब बवुमाच्या जागी संधी मिळालेल्या ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) याला खातेही उघडता आले नाही. रायले रिक्लटन २५ चेंडूत २७ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर मात्र रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि हेन्री क्लासेन ही जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी करत सेमीत तगडी फाइट देण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले. क्लासेन ६४ धावांवर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्याशिवाय इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरला दोन विकेट्स मिळाल्या.  इंग्लंड विरुद्धच्या विजयासह 'ब' गटात दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वलस्थानावर तर  ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील निकालानंतर सेमीत कोण कुणाविरुद्ध भिडणार ते स्पष्ट होणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यात जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी खेळेल. तर पराभूत संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमी फायनल खेळताना दिसेल. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५इंग्लंडद. आफ्रिका