Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:09 IST

Open in App

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, बीसीसीआयने नेहमीच भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दर्शवला आहे. आशिया चषकाप्रमाणे टीम इंडियाचे सामने पाकिस्तानात न होता तटस्थ ठिकाणी खेळवले जातील अशी चर्चा आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. तसेच बीसीसीआयने तटस्थ ठिकाणी भारताचे सामने खेळवावेत अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात व्हावी असे प्रत्येक देशाला वाटते. आम्ही मागील काही महिन्यांपासून आमच्या मैदानांचा विकास करित आहोत. पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद सांभाळण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. नियोजित वेळापत्रकानुसार आणि ठरलेल्या ठिकाणीच अर्थात पाकिस्तानातच स्पर्धा खेळवली जाईल, असे मोहसिन नक्वी यांनी नमूद केले. ते माध्यमांशी बोलत होते.  

तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी तटस्थ ठिकाणी होईल अशी कोणाशीच चर्चा झालेली नाही. बीसीसीआयने जरी अशी मागणी केली तरी याला आमचा विरोध असेल. क्रिकेटमध्ये राजकारण येता कामा नये. आयसीसी किंवा बीसीसीआय... यापैकी कोणीच आम्हाला पाकिस्तानात येणार नसल्याचे पत्र दिले नाही. आम्ही नेहमीच भारतात खेळण्यास तयारी दर्शवली आहे. अनेकदा आम्ही कमीपणा घेतला असला तरी यावेळी आम्ही तसे कदापि करणार नाही, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले.

PCB ने दिली होती माहिती...काही महिन्यांपूर्वीच पीसीबीने आयसीसीला प्रस्तावित (संभाव्य) वेळापत्रक पाठविले होते. याच वेळापत्रकानुसार स्पर्धेची घोषणा करण्यासाठी आयसीसीकडे पीसीबीची मागणी.पीसीबीने प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकानुसार १ मार्च २०२५ रोजी लाहोर येथे भारत-पाकिस्तान लढत रंगणार आहे.प्रस्तावित वेळापत्रकानुसार सुरक्षेच्या कारणामुळे भारताचे सर्व सामने लाहोर येथेच खेळविण्यात येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासाठी कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियम्सच्या नूतनीकरणासाठी पीसीबी सुमारे १३ अब्ज रुपये खर्च करत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीबीसीसीआय