दुबई: टी२० क्रिकेटमध्ये षटकांची गती कमी राखल्यास आता ICCकडून यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. शुक्रवारी ICC कडून या नव्या नियमाची घोषणा करण्यात आली. या नियमानुसार, सामना संपल्यानंतर दंडात्मक कारवाई न करता मैदानात चालू सामन्यातच २०व्या षटकासाठी सीमारेषेवर एक खेळाडू कमी ठेवावा लागण्याची शिक्षा असणार आहे. हा नियम याच महिन्यापासून लागू केला जाणार आहे.
ICC ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कोणत्याही उभय देशांमध्ये जर टी२० मालिकेचे आयोजन करण्यात आले असेल तर त्या मालिकांच्या सामन्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा की नाही याचा निर्णय दोन संघ ठरवतील. पण षटकांची गती कमी राखणं मात्र आता भारी पडू शकतं. जर सामन्याच्या शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकताना षटकांची गती ही निर्धारित वेळेनुसार नसेल तर त्याचा फटका संघाचा मैदानावरच बसेल. कारण तसे झाल्यास त्यापुढचे उर्वरित षटक फिल्डिंग करणाऱ्या संघाला ३० यार्ड सर्कलबाहेरील एक खेळाडू कमी करावा लागेल.
ICCच्या क्रिकेट समितीने विचारपूर्वक हा नियमातील बदल सुचवला आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या द हंड्रेड नावाच्या लीग स्पर्धेत अशा प्रकारचा एक नियम ठेवला होता. त्याच नियमाची प्रेरणा घेत ICC च्या क्रिकेट समितीने या नियम स्पष्ट केला आहे.
ड्रिंक्स ब्रेकबद्दलही नियमात बदल करण्यात आला आहे. दोन देशांमधील मालिकेत प्रत्येक डावाच्या मध्यांतरात अडीच मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो. तो ब्रेक घ्यायचा की नाही, हे दोन्ही देशांनी मालिका सुरू होण्याआधीच ठरवून घ्यायचं आहे, असंही ICCकडून सांगण्यात आलं आहे.
नव्या बदललेल्या नियमांची अंमलबजावणी १६ जानेवारीला आयर्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज या सामन्यापासून होणार आहे.