ICC Cricket World Cup 2023 controversy : पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली. मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) व २३ वर्षीय अब्दुल्लाह शफिक ( Abdullah Shafique) यांच्या १७६ धावांच्या विक्रमी भागीदारी आणि वैयक्तिक शतकांच्या जोरावर पाकिस्तानने विजय खेचून आणला. वर्ल्ड कप पदार्पणात शतक झळकावणारा शफिक हा पहिला पाकिस्तानी ठरला, तर पाठीच्या दुखापतीने अन् पायाला क्रँम्प येऊनही रिझवान खेळपट्टीवर उभा राहिला आणि वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात ४ शतक झळकले गेल्याची ही पहिलीच वेळ ठरली.
शफिकने १०३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११३ धावा केल्या, तर रिझवान १२१ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३४ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानने ४८.२ षटकांत ६ विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यानंतर मोहम्मद रिझवानने आपली खेळी गाझामधील इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धातील पीडितांना समर्पित केली आहे.
“हे गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी होते. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. संपूर्ण टीमला आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अली यांना श्रेय देतो. आदरातिथ्य आणि संपूर्ण समर्थनासाठी हैदराबादच्या लोकांचे अत्यंत आभारी आहे ,” रिझवानने बुधवारी आपल्या ट्विटरवर लिहिले.