भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सचिन तेंडुलकरचं हे ट्विट आता व्हायरल होत आहे. या सामन्यात २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३ बाद दोन धावा अशी अवस्था झाली असताना विराट कोहली (८५) आणि लोकेश राहुल (नाबाद ९७) यांनी चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला होता.
भारतीय संघाचं अभिनंदन करताना केलेल्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर म्हणाला की, भारताच्या गोलंदाजांची कामगिरी जबरदस्त झाली. त्यामुळेच आपण ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत रोखू शकलो. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मात्र त्यांना डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाची कमतरता जाणवली. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यामध्य जबरदस्त ताळमेळ दिसून आला. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यात यश मिळाले. दोघांनीही काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या डावात चेंडूचा बॅटशी चांगला संपर्क होत होता. या सुरेख सुरुवातीसाठी टीम इंडियाचं अभिनंदन, असं सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मात्र याच ट्विटमध्ये सचिनने ऑस्ट्रेलियन संघाने घेतलेल्या एका निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्याने ट्विटमध्ये लिहिलं की, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला याचं मला आश्चर्यं वाटलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली होती. तसेच त्यांचा संपूर्ण संघ १९९ धावांत गारद झाला होता.