भारतीय संघातील डावखुरा सलामीवीर शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या या खेळाडूला सध्या संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत करावी लागत आहे. दरम्यान, आपल्या करिअरमधील पुढील वाटचाल आणि भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाबाबत त्याने महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
शिखर धवनने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएलला आपलं लक्ष्य बनवलेलं आहे. त्याने सांगितलं की, माझा इरादा यावेळच्या स्पर्धेत माझ्या संघाला विजेतेपद मिळवून द्यायचं आहे. पंजाब किंग्सचं कर्णधारपद भूषवताना संघाला ट्रॉफी जिंकून द्यायची आहे. माझ्या मनात कुठलीही नकारात्मक गोष्ट चालत नाही. तर मी माझं काम करत राहू इच्छितो.
भारतीय संघाला आयसीसीच्या वनडे वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर शिखर धवनचीही निराशा झाली होती. त्याने सांगितले की, भारतीय संघाचा पराभव झाला यावर माझा विश्वास बसत नव्हता. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत ज्या प्रकारचा खेळ केला, तो पाहता भारतीय संघ पराभूत होईल, असं वाटत नव्हतं. अंतिम सामन्यातील खेळपट्टी थोडी स्लो होती. खेळपट्टी ज्या प्रकारे खेळली त्यामुळे भारतासाठी सामना जिकणं कठीण गेलं, असेही शिखर धवनने सांगितले.