ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या ३५१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पण, १४ धावांनी पाकिस्तानने मॅच गमावली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने मात्र टीम इंडियाचे टेंशन नक्की वाढले असेल कारण वर्ल्ड कप स्पर्धेत ८ ऑक्टोबरला त्यांना ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.
वॉर्नर आणि मिचेल मार्श यांची ८३ धावांची भागीदारी उसमान मीरने तोडली. वॉर्नर ३३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मीरने पुढच्या षटकात मार्शला ( ३१) माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथ ( २१) व लाबुशेन ( ४०) यांनी संयमी खेळ करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. अॅलेक्स केरी ( ११) अपयशी ठरला असला तरी ग्लेन मॅक्सवेल कडाडला. त्याने ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन व इंग्लिस यांनी सातव्या विकेटसाठी ५१ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी केली. इंग्लिसने ३० चेंडूंत ८ चौकार १ षटकारांसह ४८ धावा केल्या. ग्रीनने नाबाद ५० धावा करून ऑस्ट्रेलियाला ७ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात, फखर जमान ( २२), इमाम-उल-हक ( १६), अब्दुल्ला शफिक ( १२) व शादाब खान ( ९) हे झटपट माघारी परतले. पण, बाबर आजम व इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तानला सावरले. या दोघांनी १४४ धावांची भागीदारी केली. इफ्तिखारने ६ चौकार व ४ षटकाराने ८३ धावा केल्या, तर बाबर ५९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९० धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. मोहम्मद नवाजने चांगली फटकेबाजी केली. त्याच्या ५० धावांनी सामना चुरशीचा बनवला होता, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकात टिच्चून मारा केला अन् सामना १४ धावांनी जिंकला. पाकिस्तानला ४७.४ षटकांत ३३७ धावा करता आल्या.