ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : ७ वर्षानंतर प्रथमच भारतात आलेल्या पाकिस्तानच्या संघातील बहुतेक खेळाडू यापूर्वी इथे कधी खेळलेलेच नाही. बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) हे प्रथमच भारतात खेळत आहेत. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात पाकिस्तानच्या या दोन फलंदाजांनी मैदान गाजवले. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात मोहम्मद रिझवानने शतक झळकावले, तर बाबरने ८० धावांची खेळी केली. सौद शकिलने ( Saud Shakeel) शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला.
७ वर्षानंतर भारतात आलेल्या पाकिस्तान संघातील बरेच सदस्य इथे प्रथमच खेळणार आहेत. त्यामुळे त्यांनी सराव सामन्यावर लक्ष केंद्रित केलेले पाहायला मिळाले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्याने तो दोन्ही सराव सामन्यांसह ५ ऑक्टोबरला होणाऱ्या पहिल्या ( वि. इंग्लड) सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने आजच्या सराव सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, अब्दुल्लाह शफीक ( १४) व इमाम उल हक ( १) हे सलामीवीर अवघ्या ४६ धावांवर माघारी परतले. कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या सीनियर्सनी पाकिस्तानचा डाव सावरला अन् दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. बाबर ८४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर झेलबाद झाला.
रिझवानने शतक झळकावले आणि त्याला सौद शकिल याची चांगली साथ मिळाली. रिझवान ९४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून १०३ धावांवर रिटायर आऊट झाला. सराव सामना असल्याने सर्व १५ सदस्यांना खेळण्याची संधी मिळावी यासाठी त्याने हा निर्णय घेतला. सौद शकिलने नंतर हार मोकळे केले आणि शेवटच्या १० षटकांत चांगले फटके खेचले. ४६ षटकांत पाकिस्तानने फलकावर ३००+ धावा चढवल्या. सौद ५३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ७५ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. आघा सलामान ( ३३*) आणि शादाब खान ( १६) यांनी चांगला खेळ करून पाकिस्तानला ५० षटकांत ५ बाद ३४५ धावापर्यंत पोहोचवले.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ २६३ धावांवर ऑल आऊट...
पथूम निसंका ( ६६) आणि धनंजया डी सिल्वा ( ५५) यांच्या अर्धशतकांशिवाय श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत २६३ धावांत तंबूत परतला. महेदी हसनने ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सराव सामना पावसामुळे रद्द करावा लागला.
Web Title: ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : Mohammad Rizwan ( 103), Babar Azam ( 80), Saud Shakeel ( 75), Pakistan as they post 345 for 5 from 50 overs against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.