ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश यांनी अनुक्रमे पाकिस्तान व श्रीलंकेवर विजय मिळवले. पाकिस्तानचे ३४६ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सहज पार केले. भारतीय वंशाच्या राचिन रविंद्रने ९७ धावांची दमदार खेळी करून ओपनिंग करण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं केलं. सहा महिन्यानंतर दुखापतीतून सावरून मैदानावर उतरलेल्या केन विलियम्सनचे अर्धशतक किवींची ऊर्जा वाढवणारे ठरले. मार्क चॅम्पमनने षटकार खेचून विजय पक्का केला.
PAK vs NZ : भारतीय वंशांच्या राचिन रविंद्रने पाकिस्तानला धू धू धुतलं; पठ्ठ्याने संधीचं सोनं केलं
७ वर्षानंतर प्रथमच भारतात आलेल्या पाकिस्तानच्या संघातील बहुतेक खेळाडू यापूर्वी इथे कधी खेळलेलेच नाही. बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) हे प्रथमच भारतात खेळत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात मोहम्मद रिझवानने शतक झळकावले, तर बाबरने ८० धावांची खेळी केली. सौद शकिलने ( Saud Shakeel) शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून ७५ धावा केल्या आणि संघाला ५ बाद ३४५ धावांपर्यंत पोहोचवले. बाबर आणि रिझवान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. रिझवान ९४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून १०३ धावांवर रिटायर आऊट झाला.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या ३४५ धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडकडून दमदार खेळ झाला. भारतीय वंशाचा रचिन रविंद्रला ( Rachin Ravindra) याला किवींनी सलामीला पाठवले आणि तो कमाल करून गेला. डेव्हॉन कॉनवे शुन्यावर माघारी परतल्यानंतर रचिन व कर्णधार केन विलियम्सन यांनी दीडशतकी भागीदारी केली. ६ महिन्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या केनने ५० चेंडूंत ५४ धावा करून रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. पण, रचिनने ७२ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह ९७ धावा केल्या. डॅरिल मिचेल ५९ धावांवर रिटायर हर्ट झाला आणि मैदानावर आलेला ग्लेन फिलिप्स ( ३) फेल गेला.
जेम्स निशॅम आणि मार्क चॅम्पमन यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि संघाला विजय मिळवून दिला. निशॅम २१ चेंडूंत ३३ धावा करून माघारी परतला. चॅम्पमन ४१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांवर नाबाद राहिला आणि किवींनी ४३.४ षटकांत ५ बाद ३४६ धावा करून सामना जिंकला.
बांगलादेशचा श्रीलंकेवर विजयपथूम निसंका ( ६६) आणि धनंजया डी सिल्वा ( ५५) यांच्या अर्धशतकांशिवाय श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत २६३ धावांत तंबूत परतला. महेदी हसनने ३ विकेट्स घेतल्या. बांगलादेशने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. तनझिद हसन (८४), लिटन दास ( ६४), मेहिदी हसन मिराझ ( ६७*) आणि मुश्फीकर रहिम ( ३५*) यांनी हा विजय मिळवून दिला.