विश्वविजेत्या इंग्लंडला पराभूत करत खळबळ उडवून देणाऱ्या अफगाणिस्तानने आज पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवला. या विजयामुळे अफगाणिस्तानने यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील गुणतक्त्यात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या सामन्यापूर्वी गुणतक्त्यात शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानी असलेल्या अफगाणिस्तानने दोन विजय आणि चार गुणांसह सहाव्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे. तर अफगाणिस्तानच्या आजच्या विजयामुळे पाकिस्तानपासूनइंग्लंडपर्यंत अनेक दिग्गज संघांचे गणित बिघडले आहे.
आज पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ चार सामन्यांमध्ये एक विजय आणि दोन गुणांसह दहाव्या स्थानी होती. मात्र आज पाकिस्तानवरील विजयामुळे अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान कायम राहिलं आहे. सोबतच त्यांनी गुणतक्त्यातही मोठी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानचा संघ आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या संघाचेही चार गुण आहेत. मात्र सरस धावगतीमुळे पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानच्या पुढे आहे.
मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे गुणतक्त्यात मोठी उलथापालथ झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका हा आता गतविजेत्या इंग्लंडला बसताना दिसत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळवला आहे. तसेच खराब धावगतीमुळे इंग्लंडचा संघ अर्धी स्पर्धा आटोपली असताना गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर फेकला गेला आहे. गतविजेत्यांसाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे. तसेच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणेही इंग्लंडच्या संघाला कठीण होण्याची शक्यता आहे.